फुलंब्री तालुक्यात पाणी काढताना सहा महिला पडल्या विहिरीत

जिल्हा परिषदेमधील पाणीपुरवठा विभागाशी बोलून विहीर खोलीकरण व आडवे बोअरसंदर्भात कार्यारंभ आदेश आजच द्यायला लावला. उद्यापासून हे काम सुरू होईल. गावात पाण्याचे टॅंकर तत्काळ सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. - हरिभाऊ बागडे,विधानसभा अध्यक्ष विहिरीतून पाणी काढताना जखमी झालेल्या महिलांच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधीतून पैसे द्यावेत. एक महिना या महिला मजुरीपासून दूर राहिल्या. त्यामुळे उपचार व एक महिन्याचा भत्ता त्यांना देण्यात यावा. - डॉ. कल्याण काळे, माजी आमदार, फुलंब्री
फुलंब्री तालुक्यात पाणी काढताना सहा महिला पडल्या विहिरीत
फुलंब्री तालुक्यात पाणी काढताना सहा महिला पडल्या विहिरीत

फुलंब्री, जि. औरंगाबाद : तालुक्‍यातील पानेवाडी गावापासून सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या एका खासगी विहिरीतून बादलीने पाणी काढताना तब्बल सहा महिला विहिरीत पडल्या. ही घटना शनिवारी (ता. १) सकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या महिलांना वाचविण्यात यश आले आहे.

फुलंब्री शहरापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पानेवाडी ग्रामपंचायतीत प्रशासक आहे. त्यांच्या मार्फत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरचा प्रस्ताव अद्याप पंचायत समिती कार्यालयास दाखल झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. गावातील मुसा मुनीर शेख यांनी एका शेततळ्यात पाणी साठवणुकीसाठी विहीर खोदलेली आहे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या विहिरीतून पाइपलाइनद्वारे शेततळ्यातील विहिरीत पाणी टाकून ग्रामस्थांसाठी पाणी मोफत मोकळे केले.

या विहिरीतून पाणी काढण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. विहिरीच्या काठावर एक मोठे लाकूड जाड तारेच्या साह्याने बांधले होते. नेहमीप्रमाणे सहा महिला या लाकडावर एक पाय ठेवून पाणी काढत होत्या. मात्र, अचानक लाकूड तुटल्याने या महिला विहिरीत पडल्या. या विहिरीत सुमारे सात फूट पाणी होते. मात्र, महिलांनी लाकडाला धरल्याने जीवितहानी टळली. ही घटना कळल्यानंतर संपूर्ण गाव या विहिरिवर आले. त्यानंतर गावातील तरुणांनी या महिलांना सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. त्यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालायत दाखल केले. जखमी झालेल्या महिलांमध्ये सायमा कुरबान शेख, नजमा फय्याज शेख, शमीनबी युनूस शेख, सबिया युनूस शेख, मुन्नाबी युसूफ शेख, तमरुबी समद शेख आदींचा समावेश आहे.  

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष दामू नवपुते, माजी जि. प. सदस्य राजेंद्र ठोंबरे, भाजपच्या जिल्हा प्रभारी अध्यक्षा अनुराधा चव्हाण, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे, पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे, रउफ कुरेशी, मुदस्सर पटेल, राजू तुपे, अंबादास गायके आदींनी ग्रामीण रुग्णालायत येऊन जखमी महिलांची प्रकृती जाणून घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com