नांदेड विभागात यंदा गाळपासाठी १६ साखर कारखाने

नांदेड विभागात यंदा सोळा साखर कारखाने करणार ऊस गाळप
नांदेड विभागात यंदा सोळा साखर कारखाने करणार ऊस गाळप

नांदेड : यंदाच्या २०१९-२० च्या गाळप हंगामात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गंत नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील ५ सहकारी आणि ११ खासगी असे एकूण १६ साखर कारखान्यांचे ऑनलाइन गाळप परवाना प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

यंदा या चार जिल्ह्यांतील ८१ हजार ६४२ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊन सरासरी ४२ लाख ९४ हजार ५०० टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. गतवर्षी (२०१८-१९) एकूण २३ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते.

यंदा नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील २४ पैकी १६ साखर कारखान्यांनी गाळपाचे नियोजन केले आहे. गाळप परवाने दिलेल्या साखर कारखान्यांमध्ये ५ सहकारी आणि ११ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील पाच, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी चार, लातूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे.

यंदा या चार जिल्ह्यांतील एकूण ८१ हजार ६४२ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यतील १५ हजार ७५९ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील ६ हजार १२१ हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील ३० हजार हेक्टर, लातूर जिल्ह्यातील २९ हजार ७६२ हेक्टरवरील ऊसाचा समावेश आहे.

२०१८-१९ वर्षामध्ये एकूण १ लाख ४२ हजार ६०३ हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र गाळपासाठी निश्चित करण्यात आले होते. परंतु दुष्काळामुळे सिंचनासाठी पाणी कमी पडलेल्या भागातील शेतकऱ्यांनी ऊस मोडून टाकला. त्यामुळे यावर्षी ८१ हजार ६४२ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकेल. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे ६० हजार ९६१ हेक्टर एवढे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यंदा ऊस कमी पडणार असल्याने विभागातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम कमी कालावधीचे राहतील. गतवर्षी (२०१८-१९) नांदेड विभागातील चार जिल्ह्यांतील २४ पैकी २३ साखर कारखान्यांनी ७८ लाख ६२ हजार ३३३ टन ऊस गाळप केले होते. सरासरी ११.२३ टक्के उताऱ्याने ८८ लाख २७ हजार २०२ क्विंटल एवढे साखर उत्पादन घेतले होते.

गाळपासाठी संभाव्य ऊस उपलब्धता स्थिती (हेक्टरमध्ये)

जिल्हा ऊस लागवड क्षेत्र उत्पादकता ऊस उपलब्धता (टन)
परभणी १५७५९ ५०  ७८७९५०
हिंगोली ६१२१ ६०  ३६७२६०
नांदेड ३०००० ६० १८०००००
लातूर २९७६२ ४५ १३३९२९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com