जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
बातम्या
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित सुधारणा
औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित सुधारलेले असल्याचे चित्र आहे. तरीही कापसाची खासगी खरेदी शासनाच्या हमी दरांपेक्षा कमीच असल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित सुधारलेले असल्याचे चित्र आहे. तरीही कापसाची खासगी खरेदी शासनाच्या हमी दरांपेक्षा कमीच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तत्काळ प्रभावाने शासनाचे हमी दराने कापूस खरेदी केंद्रे सुरू होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यंदा मराठवाड्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर होते. प्रत्यक्षात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९२ टक्के अर्थात १४ लाख ६१ हजार ३३५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यात लातूर जिल्ह्यातील ८२७५ हेक्टर, उस्मानाबाद ८००१ हेक्टर, नांदेड २ लाख १४ हजार ४८७ हेक्टर, परभणी १ लाख ७६ हजार ५०१ हेक्टर, हिंगोली ३८ हजार ७९८ हेक्टर, औरंगाबाद ३ लाख ९१ हजार २६१ हेक्टर, जालना ३ लाख ५ हजार ८६३ हेक्टर, तर बीड जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार १४९ हेक्टरवरील कपाशी पिकाचा समावेश आहे.
सतत व अति पावसामुळे यंदा इतर पिकांबरोबरच कपाशीची अवस्थाही बिकट झाली आहे. गुलाबी बोंड अळी, दहिया आदी बरोबरच बोंडसडीने कपाशीच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त फटका बसला आहे. लांबलेल्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसाच्याही वाती करण्याचे काम केले. त्यामुळे चांगल्या उत्पादन झालेल्या कापसाला तरी निदान हमी दराने खरेदी केली जाईल, या आशेवर उत्पादक कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत औरंगाबाद, जालना, बीड आदी जिल्ह्यांत खासगीत कापसाचे खरेदी दर ५००० ते ५४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत असल्याची माहिती शेतकरी व जाणकारांनी दिली. शासनाचा खरेदी दर मात्र ५७०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहे. हमी दराने कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू असली, तरी अनेकदा नोंदणीची साईट बंद असल्याने किंवा ग्रामीण भागात नेट मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य होत नसल्याची माहिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
‘मराठवाड्यात ४४ केंद्रे सुरू’
मराठवाड्यात ४४ केंद्रे सुरू केल्याची माहिती सीसीआय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. आणखी तीन ते चार केंद्रे सुरू होणे अपेक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कापूस पणन महामंडळाच्या वतीने औरंगाबाद विभागात तीन व बीड विभागात तीन अशा सहा केंद्रांवर हमी दराने कापूस खरेदीची तयारी करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात या तयारीला आदेशाची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- 1 of 1495
- ››