दुष्काळावर मात करणारे सेनापती

संजय मोरे पाटील आणि ईश्वर सपकाळ
संजय मोरे पाटील आणि ईश्वर सपकाळ

औरंगाबाद : साडेबारा हजार फळझाडांची स्वतःची बाग सांभाळून इतर ६५० शेतकऱ्यांना गटशेतीचे धडे देणारे संजय मोरे पाटील असोत की पाच एकर शेती कसून ४० एकराचा शेतीमालक झालेले ईश्वर सपकाळ असोत...मराठवाड्यातील दुष्काळाशी जिद्दीने सामना करणारे हे शेतकरी नव्हे, तर सेनापती असल्याची साक्ष अॅग्रोवनच्या प्रदर्शनातून इतर शेतकऱ्यांना बघण्यास मिळाली.  'सकाळ अॅग्रोवन'च्या भव्य कृषी प्रदर्शनात आधुनिक शेतीचे तंत्र व प्रयोगशील कृषीव्यवस्थेची विविधांगी पद्धतीने माहिती मिळतेच आहे. याशिवाय संजय-ईश्वरसारखे अनेक जिद्दी शेतकरी या ज्ञानसोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.  संजय मोरे पाटील हे जाफराबाद (जि. जालना) भागातील नळविहीरा गावचे प्रयोगशील शेतकरी आहेत. मराठवाड्यातून अमेरिकेत होणाऱ्या केशर आंब्याच्या निर्यातीत मोलाची कामगिरी बजावल्याने त्यांना कृषिरत्न पुरस्कार मिळाला आहे. २००३ पासून दुष्काळी भागात जिद्दीने शेती करणाऱ्या संजय यांनी ४८ एकरावर शेती फुलविली आहे. त्यातील १७ एकरात मिश्रफळ पिके आहेत. ९ एकरावर सीताफळ लागवड करताना त्यांनी ६५० शेतकऱ्यांना एकत्र आणून ''नल'' नावाने कृषी उत्पादनांचे ब्रॅंडिंगही सुरू केले.  आंबा, आवळा, सीताफळ, डाळिंब अशा विविध पिकांच्या १२ हजार ५०० झाडांचे संगोपन करताना संजय यांनी चक्क सात भागांमधून पाणी आणले. त्यांनी ९ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची कष्टपूर्वक गटबांधणी करीत ४०० एकरावर सीताफळ लागवडीसाठी प्रोत्साहन दिले.  ‘‘राज्यात यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई आहे. पण, आम्ही नाऊमेद झालेलो नाही. दुष्काळ आमच्यासाठी एक संधी आहे. २४ बॅरल पाणी असले तरी सीताफळाची एक एकर फळबाग जगवून दाखवितो. अत्यल्प खर्चात फळबागा उभ्या करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची बांधणी करतो आहोत,’’ असे संजय पाटील सांगतात.  दुष्काळी स्थितीत देखील यंदा मराठवाड्यात दहा एकरामधून आतापर्यंत १८० क्विंटल कापूस काढणारे ईश्वर शिवाजी सपकाळ हेदेखील सेनापतीसारखेच भासतात. अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत पुन्हा उभे करण्याची किमया साधणारे ईश्वर काही वर्षांपूर्वी अवघ्या पाच एकर जमिनीचे मालक होते. आता ते १५ एकरावर हळद, तीन एकरावर अद्रक, तीन एकरावर केळी, दोन एकरावर मका, तर दहा एकरावर कापूस पिकवतात. ‘‘माझी शेती म्हणजे प्रयोगशाळा आहे. मल्चिंगवर कापूस, झेंडूचे आंतरपीक, केळीच्या बागेत बिगर मल्चिंगवर ३५ टन टरबूज, कपाशीत आंतरपीक, एकरी २२५ क्विंटल हळद उत्पादन अशा विविध प्रयोगांनी मी माझी शेती फुलवितो आहे. शेती परवडते. पण तुम्हाला शेतीसाठी वेळ देता आला पाहिजे, असे ते सांगतात.  ‘‘कष्टाळू व प्रयोगशील शेतकरी कधीही वेळ वाया घालवत नाही. मी २४ तास शेतातच राहतो. योग्य ठिकाणी वेळ दिला तर तुम्हाला फायदाच होतो. ‘अॅग्रोवन’चे प्रदर्शन माझ्यासाठी एक उपयुक्त ठिकाण असते,’’ असेही ईश्वर सपकाळ सांगतात.  

प्रदर्शन म्हणजे माहितीचा खजिना शेतकऱ्यांना गटशेतीचे धडे देणारे प्रयोगशील शेतकरी संजय मोरे पाटील म्हणाले की, अॅग्रोवनचे कृषी प्रदर्शन आम्हा शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिनाच असतो. ‘अॅग्रोवन’ हा शेतकऱ्यांसाठी पेपर नव्हे तर परिवारासारखे काम करतो. त्यामुळेच मी चार दिवस प्रदर्शनासाठी वेळ काढून आलो आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com