जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजार

मराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा नागनाथ) जनावरांमध्ये नाकपुडीतील गाठ (नेझल सिस्टोझोमोसिस) किंवा स्नोअरिंग आजार आढळला आहे. तातडीने जनावरांची तपासणी करून उपचार करावेत.
Snoring disease in animals
Snoring disease in animals

मराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा नागनाथ) जनावरांमध्ये नाकपुडीतील गाठ (नेझल सिस्टोझोमोसिस) किंवा स्नोअरिंग आजार आढळला आहे. तातडीने जनावरांची तपासणी करून उपचार करावेत. पाण्याचे साचलेले डबके, पानथळ जागा, छोटा तलाव या ठिकाणी जनावर पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर तेथील गोगलगाईमार्फत नाकपुडीतील गाठ (नेझल सिस्टोझोमोसिस) या आजाराचा प्रसार होतो. हा आजार सिस्टोझोमा नेझॅलीस पर्णकृमीमुळे होतो. यावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. या आजारामध्ये जनावरांचा मृत्यू होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी न घाबरता आवश्‍यक काळजी घेणे आवश्‍यक आहे. आजाराची ओळख

  • स्नोअरिंग आजार (घोरणे) हा सिस्टोझोमा नेझलीस या पर्णकृमीमुळे होतो.
  • पर्णकृमी नाकातील आवरणास रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये वास्तव्य करतो.
  • गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये आजार आढळतो; परंतु विशेषतः गोवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात होतो.
  • प्रसार पाण्यामध्ये राहणाऱ्या गोगलगायीच्या इंडोप्लॅनॉरबीस प्रजातीमुळे आजाराचा प्रसार होतो. कृमीचे जीवनचक्र 

  • जनावरांच्या नाकपुडीतून येणारे स्राव, रक्ताद्वारे अंडी, पाणी व सभोवताली टाकली जातात.
  • अंड्यांमधून बाल्यावस्था बाहेर येते.
  • पाण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या गोगलगायींमध्ये अर्भकावस्था विकसित होते. यास सरकेरिया म्हणतात. अर्भकावस्था पाण्यामध्ये सोडली जाते.
  • जनावरांच्या शरीरामध्ये त्वचेद्वारे हे सरकेरिया प्रवेश करतात.
  • प्रौढ कृमी नाकातील रक्तवाहिन्यांमध्ये वास्तव्य करतात.
  • कृमींनी दिलेल्या अंड्यांना काटा असतो. असे काटे रुतल्यामुळे अंड्याभोवती पेशीमय सूज येते, ज्याचा आकार फुलकोबीसारखा असतो.
  • आजाराची लक्षणे

  • कृमीची अवस्था नाकातील आवरणामध्ये वाहिन्यांमधून बाहेर येतात. त्यांचा काटा सतत टोचत राहिल्यामुळे त्याभोवती शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्तीमुळे पेशीमय सूज येते. उपचार न केल्यास ही सूज दिवसेंदिवस वाढत जाते. परिणामी, नाकपुडीमध्ये मोठी फुलकोबीच्या आकाराची गाठ तयार होऊन श्‍वासनलिकेमध्ये अडथळा निर्माण होतो.
  • जनावरांना श्‍वसनास त्रास होत असल्यामुळे ते जोरात श्‍वास घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी जोरात घोरण्यासारखा आवाज येतो. सरकेरियाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गाठीच्या स्वरूपात वाढ होऊन रोगाची लक्षणे दिसण्यासाठी दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
  • जनावरांना होणारा त्रास

  • श्‍वासोच्छवासास त्रास होऊन घोरण्यासारखा आवाज येणे.
  • जनावराचे चरण्यावरील लक्ष कमी होते.
  • जनावरांचे आरोग्य खंगत जाते.
  • नाकाद्वारे रक्तमिश्रित स्राव सतत बाहेर येतो.
  • नाकपुडीमध्ये फुलकोबीच्या आकाराची पेशीमय सूज बाहेरून दिसते.
  • निदान

  • लक्षणांवरून निदान.
  • नाकातून बाहेर येणाऱ्या स्रावाची पशुवैद्यक तज्ज्ञांमार्फत तपासणी करावी.
  • जनावरे कुठल्या खाचखळग्यातील पाणी पिते, तिथे गोगलगायींचे वास्तव्य आहे का हे तपासावे.
  • उपचार आजारावर प्रभावी औषध उपलब्ध आहे. लक्षणे आढळल्यानंतर तज्ज्ञ पशुवैद्यक तज्ज्ञांकडून तातडीने उपचार करून घ्यावेत. नियंत्रणाची दिशा

  • तळे, पाण्याचे डबके येथील पाणी पिल्यामुळे किंवा चरावयास गेल्यामुळे आजाराची लक्षणे दिसत असल्यास तात्काळ सदरील पाणवठा प्रतिबंधित करून काही काळासाठी जनावरांना गोठ्यामध्ये पाण्याची व्यवस्था करावी.
  • प्रादुर्भावित तळे, पाणथळ जागेस कुंपण घालून प्रतिबंधित करावे; तसेच सभोवतालचे गवत कापून वाळवावे.
  • प्रादुर्भाव झालेल्या जनावराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
  • खबरदारीचे उपाय

  • सर्वच तळे, पानथळ डबके यामध्ये गोगलगायी असल्या म्हणजे आजार होतोच असे नाही. कृपया गैरसमज टाळावा.
  • पाण्याचा इतर स्रोत उपलब्ध नसल्यास जनावरांना या ठिकाणीदेखील पाणी पिण्यास द्यावे; परंतु लक्षणे दिसल्यास तात्काळ उपाय करावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये जनावरांना पाण्यापासून वंचित ठेवू नये.
  • संपर्क- डॉ. बाबासाहेब नरळदकर,९४०३८४७७६४ डॉ. दीपक धर्माधिकारी, ९४२१३९२०२४ (डॉ. नरळदकर हे पशुवैद्यक महाविद्यालय (परभणी) येथे आणि डॉ. धर्माधिकारी औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथे सहायक पशुधन आयुक्त आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com