बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवर
शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी गावाच्या जमिनीतील अन्नद्रव्यांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावे, याबाबत सुपीकता निर्देशांकांची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
पुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी गावाच्या जमिनीतील अन्नद्रव्यांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावे, याबाबत सुपीकता निर्देशांकांची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हे सुपीकता निर्देशांक तयार करताना संबंधित गावातील प्रमुख पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पिकांसाठी प्रति हेक्टरी खतांची मात्रा व उपायोजनांच्या शिफारशीचा अवलंब करता येणार आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षांत ५७ लाख माती परीक्षण नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, दोन कोटी ६४ लाख माती आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. माती परीक्षण नमुन्यांमुळे रासायनिक खतांच्या वापरात ८ ते १० टक्क्यांनी घट झाली आहे.
तर पीक उत्पादनात ५ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ३८ हजार ५७९ गावांचे जमीन सुपीकता निर्देशांक तयार करताना चार घटकांवर आधारित एका गावाचे बारा वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा विचार करण्यात आला आहे. हे सुपीकता निर्देशांक तयार करताना त्या त्या गावातील प्रमुख पाच पिकांचा त्यात खरीप तीन आणि रब्बी दोन असा समावेश करण्यात आला आहे.
जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या सायकलमध्ये तपासलेल्या सर्व मृद् नमुन्यांची सांख्यिकी माहिती केंद्र शासनाच्या सॉइल हेल्थ या संगणक प्रणालीवर उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा, तालुका व गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांक कृषी आयुक्तलयाने राष्ट्रीय सूचना केंद्र पुणे (एनआयसी) यांच्या मदतीने तयार केले आहे. माती परीक्षणाच्या आधारे प्रमुख पीकनिहाय, जिल्हानिहाय अन्नद्रव्यांचा सुपीकता निर्देशांक व सूक्ष्म मूलद्रव्ये कमतरतेनुसार खतांच्या शिफारशी तयार करून सर्व क्षेत्रीय स्तरावर प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच वापरासाठी कळविण्यात आलेले आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने प्रमुख पिकांसाठी केलेल्या खत मात्रांच्या शिफारशीचा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे. प्रमुख अन्नद्रव्यांच्या सुपीकता निर्देशांक गणिती सूत्राद्वारे, तर सूक्ष्म मूलद्रव्ये कमतरता स्थिती काढण्यात आलेली आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार ४० टक्क्यांपेक्षा जास्त नमुन्यांमध्ये सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता गृहीत धरण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील भात, कापूस, ऊस, तूर व गहू या प्रमुख पिकांसाठी खतांच्या शिफारशी नोंदविण्यात आल्या आहेत.
सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरता असल्यास झिंक सल्फेट हेक्टरी २० ते २५ किलो, फेरस सल्फेट हेक्टरी २५ किलो, बोरॅक्स ५ किलो, सल्फर २० ते ४० किलो या स्वरूपात द्यावी. तर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर जसे की हिरवळीचे खत, गांडूळ खते यांचा वापर करावा. याशिवाय पिकांच्या फेरपालटीमध्ये प्राधान्याने द्विदल पिकांचा समावेश करावा, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
सुपीकता पातळीनुसार सुपीकता निर्देशांकामध्ये पिकांसाठी शिफारशीत खत मात्रा (हेक्टरमध्ये)
सुपीकता पातळी | करावयाच्या उपाययोजना |
अत्यंत कमी | कृषी विद्यापीठाच्या शिफारशीच्या १.६७ पट अधिक खतमात्रा द्यावी |
कमी | कृषी विद्यापीठाच्या शिफारशीच्या १.३३ पट अधिक खतमात्रा द्यावी |
मध्यम | कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे खतमात्रा द्यावी |
भरपूर | कृषी विद्यापीठाच्या शिफारशीच्या ०.६६ पट कमी खतमात्रा द्यावी |
अत्यंत भरपूर | कृषी विद्यापीठाच्या शिफारशीच्या ०.३३ पट कमी खतमात्रा द्यावी |
जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खते वापरण्याचे फायदे
- रासायनिक खतमात्रा कमी लागते
- जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते
- उत्पादन वाढीस मदत होते
- अन्नद्रव्ये समतोल प्रमाणात दिली जातात
- उत्पादन खर्चातही बचत होते
जिल्हानिहाय सुपीकता निर्देशांक उपलब्ध असलेल्या गावांची संख्या ः नगर १५८८, अकोला ८३५, अमरावती १७९८, औरंगाबाद १२७५, बीड ८७६, भंडारा ८१६, बुलडाणा १४१२, चंद्रपूर १४७५, धुळे ६०८, गडचिरोली ११०३, गोंदिया ७५७, हिंगोली ६७८,जळगाव १४९५, जालना ९०४, कोल्हापूर ११९८, लातूर ८९०, नागपूर १३३३, नांदेड १४६६, नंदुरबार ७७८, नाशिक १८९०, उस्मानाबाद ७११, पालघर ६८८, परभणी ७४३, पुणे १८२१, रायगड १५१४, रत्नागिरी १५०९, सांगली ७२३, सातारा १५७१, सिंधुदुर्ग ७३८, सोलापूर ११२८, ठाणे ७२५, वर्धा ११८१, वाशीम ७००, यवतमाळ १६५२.
प्रतिक्रिया
जमीन आरोग्य पत्रिका योजनेच्या दुसऱ्या सायकलमधील मृद् नमुने तपासणीच्या आधारे उपलब्ध झालेल्या सांख्यिकी माहितीनुसार राज्यातील गावांचे जमीन सुपीकता निर्देशांक तयार केले आहे. ते सर्व शेतकऱ्यांना पाहता यावेत यासाठी ते कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत.
- अशोक बाणखेले, कृषी उपसंचालक, (मृद् चाचणी) कृषी आयुक्तालय, पुणे
- 1 of 655
- ››