पुणे जिल्ह्यातील ९२२ गावांमधून घेतले जाणार मृदा नमुने

पुणे जिल्ह्यातील ९२२ गावांमधून घेतले जाणार मृदा नमुने
पुणे जिल्ह्यातील ९२२ गावांमधून घेतले जाणार मृदा नमुने

पुणे : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या सूचनेवरून पुणे जिल्ह्यात येत्या १५ मेपर्यंत मृदा नमुने घेणे व मृद आरोग्यपत्रिका वितरणाची विशेष मोहित हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण ९२२ गावांमधून मृद्‌ नमुने घेण्याचा लक्ष्यांक देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात जमीन आरोग्यपत्रिका योजनेअंतर्गत चालू वर्षासाठी ९२२ गावांमधून एक लाख चार हजार ६५५ मृद्‌ नमुने घेण्याचा तसेच तीन लाख ८० हजार ५३७ आरोग्यपत्रिका वाटपाचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून लक्षांका प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवडलेल्या गावातील लागवडीयोग्य असलेल्या क्षेत्रामधून बागायत क्षेत्रासाठी अडीच हेक्‍टर व जिरायत क्षेत्रासाठी दहा हेक्‍टर क्षेत्रामधून एक मृद्‌ नमुना घेण्यात येतो.

दिलेल्या लक्षांकाच्या ८० टक्के नमुने ३० मेपर्यंत घेण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी सहायकांनी मृद्‌ नमुने गोळा करण्यासाठी प्रशिक्षित, माहितीगार तज्ज्ञ, शेतकरी किंवा गावातील आत्माअंतर्गत नियुक्त केलेल्या कृषी मित्रांची मदत घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

तसेच संबधित कृषी सहायकांनी गावातील मृद्‌ नमुने काढण्यापूर्वी कालावधी निश्‍चित करून गावात दवंडी देणे किंवा ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर सूचना लिहून गावातील शेतकऱ्यांच्या या योजनेत सहभाग वाढवावा. २०१७-१८ मध्ये तयार केलेल्या जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण देखील शेतकऱ्यांना  पेरणीपूर्वी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खरीप हंगामासाठी खतांचे नियोजन करावे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com