सोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले

सोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले
सोलापुरात भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी गड राखले

सोलापूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ११ जागांचे निकाल जवळपास हाती आले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर या मतदारसंघांचे आपापले गड राखले. शिवाय, अक्कलकोट आणि माळशिरस या दोन अतिरिक्त जागाही मिळवल्या. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेने सर्वाधिक ६ जागा घेतल्या; पण केवळ एकाच जागेवर त्यांना विजय मिळवता आला. शिवसेनेच्या बंडखोरांचा सर्वाधिक फटका पक्षाच्या उमेदवारांना बसला. बार्शी आणि करमाळ्यात अपक्षांनी बाजी मारली. एकूणच या निवडणुकीत भाजपने चार, शिवसेनेने एक, काँग्रेसने एक, राष्ट्रवादी काँग्रेसने ३ आणि अपक्षांनी दोन ठिकाणी बाजी मारली. 

जिल्ह्यातील सोलापूर मध्य, बार्शी, अक्कलकोट, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या मतदारसंघांत पहिल्यापासूनच सर्वाधिक चुरस होती. सोलापूर मध्यमधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना त्यांचेच समर्थक दिलीप माने यांनी शिवसेनेकडून आव्हान दिले होते. शिवसेनेचे बंडखोर महेश कोठे, एमआयएमचे फारुक शाब्दी यांसह माकपचे नरसय्या आडम यांचेही आव्हान होतेच. मतमोजणीत सुरवातीपासून प्रणिती पिछाडीवर होत्या; पण शेवटच्या फेरीत त्या विजयाजवळ पोहोचल्या. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तरमधून जवळपास ७३ हजार मतांची आघाडी घेत चौथ्यांदा आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांच्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही २९२४५ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. माळशिरस आणि सांगोल्यात शेवटपर्यंत काट्याची टक्कर झाली. माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम जानकर यांच्यात थेट लढत झाली. जानकर यांच्यावर २७०० मतांची आघाडी घेत सातपुते यांनी येथे बाजी मारली. याठिकाणी भाजपकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 

सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्याशी लढत दिली. विशेष म्हणजे सांगोला हा शेकापचा गड मानला जातो; पण पोस्टल मतावर ७११ मतांनी शिवसेनेच्या शहाजी पाटील यांनी विजय खेचून आणला. पंढरपुरात ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक भाजपकडून रिंगणात होते, त्यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेल्या भारत भालके यांनी आव्हान दिले होते; पण शेवटच्या टप्प्यात भालके यांनी इथे बाजी मारली. माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनीही ४५ हजारांहून अधिक मताधिक्‍य मिळवून एकतर्फी विजय मिळवला. 

अक्कलकोटला भाजपच्या नवख्या सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना चांगलेच आव्हान दिले. इथे कल्याणशेट्टी यांनी ३४ हजार अधिक मते घेऊन विजय मिळवला. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने यांनी १९ हजार मतांची आघाडी घेत शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांना पराभूत केले. या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसने आपला परंपरागत गड पुन्हा राखला. 

करमाळा, बार्शीत अपक्षांची बाजी 

बार्शी आणि करमाळ्यात पहिल्यापासूनच अटीतटीची लढत झाली. बार्शीत आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेकडून आणि त्यांना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत यांनी अपक्ष लढत दिली. पण इथे राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली. करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या रश्‍मी बागल यांना उमेदवारी दिली, त्यामुळे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी केली; पण या दोघांमध्ये अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही उडी घेतल्याने ही निवडणूक रंगतदार झाली. इथे बागल या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या, तर पाटील आणि शिंदे या दोघांमध्ये इथे लढत झाली; पण मतमोजणीवेळी मतात तफावत आढळल्याने अंतिम निकाल होऊ शकला नाही. फेरमोजणी सुरू झाली. बार्शी आणि करमाळा या दोन्ही ठिकाणी अपक्षांपैकी एक अपक्षच निवडून येणार हे निश्‍चित झाले.

शेकापचा गड कोसळला

सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ ेते गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघातून १९९५ चा अपवाद वगळता सलग ५० वर्षे नेतृत्व केले आहे. यंदा त्यांनी स्वतः वयोमानामुळे निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली; पण ऐनवेळी रुपनर यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करत नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. इथे शिवसेनेने माजी आमदार शहाजी पाटील यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे नेहमी शेकापबरोबर असतात; पण या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या पाटील यांना पाठिंबा दिला. या सर्व पार्श्‍वभूमीवर गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. देशमुख यांची लढत कठीण वाटत असताना, निवडणूक निकालातही तसेच झाले. शेवटी शेकापचा गड कोसळला.

निवडणुकीची वैशिष्ट्ये

  •  पालकमंत्री देशमुख सर्वाधिक ७३ हजार मतांनी      विजयी
  •  प्रणिती शिंदे यांची विजयी हॅटट्रिक
  •  अक्कलकोटला सचिन कल्याणशेट्टींची बाजी
  •  शिवसेनेला बंडखोरांचा फटका
  •  भाजपच्या आणखी दोन जागा वाढल्या 
  •  बार्शी, करमाळ्यात पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठता   पणाला
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com