सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१ टक्के पेरणी

सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१ टक्के पेरणी
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१ टक्के पेरणी

सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण, रब्बी हंगामाच्या तोंडावर मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आणि वाफसा नसल्याने जिल्ह्यात पेरणीची कामे रखडली. पण पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने आता सगळीकडे उशिराच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. आत्तापर्यंत २ लाख २५ हजार ७०९ हेक्‍टर (३१ टक्के) क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. उशिरा पेरण्या झाल्या, तरी यंदा पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून खरिपाच्या पेरणी क्षेत्रामध्ये वाढ झाली. तर, रब्बीच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट झाली. हे लक्षात घेता खरीप व रब्बी या दोन्ही पिकांचा जिल्हा अशी नवी ओळख सोलापूरची निर्माण होऊ लागली आहे. मागील चार-पाच वर्षांपूर्वी रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र जवळपास सात लाख हेक्‍टरवर होते. पण, त्यामध्ये हळूहळू घट होत गेली आहे. त्याची सुरुवात २०१४ पासून झाली. २०१४ ला चार लाख १३ हजार ११९, २०१५ ला चार लाख २३ हजार २५२, २०१६ ला तीन लाख ९५ हजार ५४४, २०१७ ला तीन लाख २६ हजार ८५१, तर २०१८ ला जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाल्याने केवळ दोन लाख ४३ हजार २०१ हेक्‍टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली होती. त्यामुळे पाच वर्षांचे सरासरी पेरणी क्षेत्र तीन लाख ६० हजार ६१३ हेक्‍टर इतके होते. 

मागील पाच वर्षांच्या सरासरी आकडेवारीकडे नजर टाकली असता, रब्बीच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट झाली असल्याचे दिसून येते. पण यंदा पावसाने काहीशी उशिरा सुरुवात केल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर पेरण्या रखडल्या. पण, आता बऱ्यापैकी वाफसा आल्याने पेरण्यांची पुन्हा सुरुवात झाली आहे. 

ज्वारीचा सर्वाधिक ३४ टक्के पेरा

या हंगामात सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. यंदा ज्वारीच्या पेरणीत वाढ आहे. आत्तापर्यंत ज्वारीची १ लाख ९९ हजार ६१४ हेक्‍टर क्षेत्रावर (३४ टक्के) पेरणी झाली आहे. मका ११ हजार ३२८ हेक्‍टर, गहू १० हजार ३० हेक्‍टर, हरभरा २३ हजार हेक्‍टर अशी पेरणी झाली आहे. पण त्याशिवाय तीळ, करडई, जवस आदी अन्य पिकांचाही एकूण पेरणीत समावेश आहे. जिल्ह्याचे पेरणीचे सरासरी क्षेत्र ७ लाख २१ हजार ८७७ हेक्‍टर आहे. त्यापैकी आत्तापर्यंत २ लाख २५ हजार ७०९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com