सोलापूर जिल्ह्यात पावसाने डाळिंब, केळीला फटका

सोलापूर जिल्ह्यात पावसाने डाळिंब, केळीला फटका
सोलापूर जिल्ह्यात पावसाने डाळिंब, केळीला फटका

सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या वळवाच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी सोमवारी (ता. ३) जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत फळबागांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः माळशिरस, करमाळ्यात केळी बागांना मोठा फटका बसला. वीज पडून मोहोळ तालुक्‍यातील गलंदवाडीतील तरुणाचा आणि घराची भिंत पडून माढा तालुक्‍यातील भोगेवाडीत चार वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही घडली. 

सोमवारी आणि मंगळवारी (ता. ४) पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. पावसाचा जोर कमी होता. पण त्या तुलनेत वादळी वाऱ्यांमुळे मोठे नुकसान झाले. माळशिरस तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांनी प्रामुख्याने केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. संगम, बाभूळगाव भागात केळीच्या पिकास वाऱ्यांमुळे जोरदार तडाखा बसला. आधीच दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. या भागात केळीच्या बागांमधील सुमारे ८० टक्के झाडे जमीनदोस्त झाली. त्याशिवाय महाळुंग, गणेशगाव, तांबवे, पायरी पूल, पंचवीस चार या भागांत देखील अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. 

लवंग, वाघोली, वाफेगाव भागांत मोठे ऊस, कडवळ ही पिके वाऱ्यांमुळे पूर्णपणे आडवी पडली आहेत. गणेशगाव शिवारात तोडणीस आलेली डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. बीजवडी भागात डाळिंबासाठी लावलेले ताण निसटले आहेत. याशिवाय अकलूज-टेंभुर्णी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक झाडांच्या मोठ्या फांद्या वाऱ्यांमुळे तुटून पडल्या. शेत-शिवारात अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उखडून पडली आहेत. 

करमाळा आणि माढा भागांतही अनेक ठिकाणी केळी, द्राक्ष, डाळिंब पिकांचे नुकसान झाले. करमाळ्यात जेऊर, चिखलठाणा भागांत हे नुकसान झाले. माढ्यात उपळाई, अंजनगाव, भोगेवाडी परिसराला फटका बसला. या वादळी वाऱ्यांनी माढ्यातील जवळपास ५५ घरांचे नुकसान झाले. बार्शीतील पांगरी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. 

गलंदवाडीत तरुणाचा, भोगेवाडीत चिमुरड्याचा बळी

वादळी वाऱ्यांमुळे घरावरील पत्रे उडून पत्रा व वीट डोक्‍यात लागल्याने समर्थ कूर्मदास पिसाळ (वय ४) हा मुलगा मृत्युमुखी पडला. माढा तालुक्‍यातील भोगेवाडी येथे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी त्यांच्या घरात छोट्या समर्थसह आई व त्याच्या मोठ्या तीन बहिणी होत्या. घरावरील उडालेला पत्रा व वीट डोक्‍यात लागल्याने लहानग्या समर्थसह त्याची आई पल्लवी व बहिणी जखमी झाल्या. भोगेवाडी ते पिसाळ वस्ती येथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. जोरदार वारा, पावसामुळे जखमी अवस्थेत असलेल्या कूर्मदासला कुर्डुवाडी येथे दवाखान्यात आणण्यास उशीर झाला.

दुसरी घटना मोहोळ तालुक्‍यातील गलंदवाडीत घडली. येथील सौरभ नागनाथ माने (वय २२) हा मंगळवारी (ता. ४) शेतात काम करत होता. विजा चमकू लागल्याने सायंकाळी सहाच्या सुमारास शेतातून घराकडे परतत होता. त्याच वेळी अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com