सोलापूर जिल्ह्यात स्पॉट पंचनामे ग्राह्य धरले जाणार

कुटुंब निश्‍चित करण्यासाठी केवळ शिधापत्रिकेचा आधार न धरता दोन वेगवेगळी घरे, वीज देयके, दोन गॅस जोड किंवा इतर पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. मात्र त्याद्वारे लाभार्थी कुटुंब स्वतंत्र असल्याचे सिद्ध होणे गरजेचे असेल. - सुभाष देशमुख, मदत व पुर्वसनमंत्री.
सोलापूर जिल्ह्यात स्पॉट पंचनामे ग्राह्य धरले जाणार
सोलापूर जिल्ह्यात स्पॉट पंचनामे ग्राह्य धरले जाणार

सोलापूर  : ‘‘पूरग्रस्त भागातील पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जनावरासाठी ३० हजार रुपये देण्यात येणार आहेतच. शिवाय ही मदत मिळण्यासाठी तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक व संबंधित पशुधनाच्या मालकांनी स्वाक्षरी केलेला स्पॉट पंचनामाही ग्राह्य घरण्यात येईल,’’ असे मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, ‘‘नुकसान झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठीही मदत करण्यात येत आहे. असा गोठा घराला जोडून असला किंवा शेतात असला तरीही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार २१०० रुपये प्रतिगोठा मदत देण्यात येईल. शेतीसाठी एक हेक्टरपर्यंत पीककर्ज माफ, बाधित कुटुंबांना तीन महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे. पडझड झालेल्या घरांचे बांधकाम पंतप्रधान आवास योजनेतून करतानाच राज्य शासनाकडून अतिरिक्त एक लाख रुपये दिले जातील.’’

 ‘‘घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात २४ आणि शहरी भागात ३६ हजार रुपये देण्यात येतील. कृषिपंपाच्या वीजबिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांची आर्थिक व कामाची कुवत विचारात घेऊन त्यांना कोणते गाव दत्तक देता येईल, याबाबत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त हे संयुक्तपणे निर्णय घेतील. या कार्यक्रमातंर्गत घर बांधणीसाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्यास भूसंपादन करून जागा उपलब्ध करून दिली जाईल,’’ असेही देशमुख म्हणाले.  

‘‘पायाभूत सुविधांमध्ये विद्युतपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ते या सुविधा जिल्हाधिकारी नियमित योजनेमधून निर्माण करून देतील. छोटे गॅरेज, छोटे व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा ५० हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल,’’ असे देशमुख यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com