सोलापुरात उच्चांकी तापमान; राज्यात अवकाळीची शक्यता

सोलापुरात उच्चांकी तापमान; राज्यात अवकाळीची शक्यता
सोलापुरात उच्चांकी तापमान; राज्यात अवकाळीची शक्यता

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. राज्यातील पंधरा शहरांचा पारा चाळीस अंशांच्या वर गेला आहे. मराठवाडा, विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. शुक्रवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस अशा कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   दक्षिण मध्य महाराष्ट्राचा परिसर आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच बंगालचा उपसागर ते कर्नाटकाचा दक्षिण परिसर, मन्नार आणि तमिळनाडूच्या परिसरात समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात, उद्या (रविवारी) मराठवाडा व विदर्भात तर सोमवारी (ता. १) विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  उत्तर भारतातील जम्मू आणि काश्‍मीर, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला दिसून येतो. राज्यातील बहुतांशी शहरांचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढायला सुरवात झाली आहे. सध्या कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, धुळे, नाशिक, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील पारा चाळीस अंशांच्या वर गेला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. उन्हाच्या झळा सकाळपासूनच बसायला सुरवात झाली आहे. दुपारच्या वेळेस असह्य उकाडा नागरिकांना अनुभवावा लागत आहे. त्यामुळे या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.    शुक्रवारी (ता. २९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.७ (१८.६), नगर ४२.३ (१७.०), जळगाव ४१.४ (१९.४), धुळे ४१.२ (१९.६), कोल्हापूर ३९.० (२०.५), महाबळेश्‍वर ३५.७ (२०.५), मालेगाव (२२.६), नाशिक ४०.४ (२०.३),  सांगली ४०.२ (१८.९), सातारा ३९.७ (२१.२), सोलापूर ४२.२ (२३.२), सांताक्रूझ ३२.६ (२३.२), अलिबाग ३२.२ (२२.१), रत्नागिरी ३२.४ (२२.२), डहाणू ३२.८ (२२.१), औरंगाबाद ४०.१ (२०.४), नांदेड ४१.० (२२.०), परभणी ४२.१ (१९.०), अकोला ४१.६ (२१.०), अमरावती ४१.४ (२२.२), बुलडाणा ३७.५ (२४.२), ब्रह्मपुरी ४०.७ (२२.८), चंद्रपूर ४०.६ (२३.०), गडचिरोली ३९.२ (१८.०), गोंदिया ३६.८ (१८.५), नागपूर ३९.३ (१९.४), वर्धा ४०.० (२२.४), वाशिम ३९.६ (२१.२), यवतमाळ ४१.० (२४.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com