सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते अत्यवस्थ

सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते अत्यवस्थ
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते अत्यवस्थ

सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी द्यावी आणि चालू हंगामात एफआरपी अधिक दोनशे रुपये द्यावेत, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवारी (ता. १७) तिसऱ्यादिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून, उपोषणातील सहभागी सहाही कार्यकर्ते अत्यवस्थ झाले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, बापू गायकवाड, नवनाथ माने, श्रीनिवास भोसले, मदनसिंह जाधव आणि बापू कोडक यांची प्रकृती खालावत चालली आहे. या वर्षीच्या उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये व मागील वर्षीच्या हंगामातील सिद्धेश्वर, मातोश्री आणि गोकुळ या साखर कारखान्यांनी खोटी माहिती देऊन थकवली, त्यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच एफआरपी चौदा दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना, यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊनही पहिला हप्ता जाहीर होत नाही तो त्वरित व्हावा, या विषयावर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.

शनिवारी या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काॅँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे व जिल्हा उपाध्यक्ष अख्तरताज पाटील यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह भेट दिली. मागण्यांबाबत राष्ट्रवादी काॅँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सांगून हिवाळी अधिवेशनामध्ये याकडे लक्ष वेधण्याबाबत सांगू, असे आश्‍वासन दिले. उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरचे उपसभापती विष्णू बागल त्यांच्यासह सहकारी उपस्थित राहिले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी उपोषणस्थळी भेट दिली त्यांनीही लवकरच तोडगा निघेल, उपोषण मागे घ्या, असे आवाहन केले. पण, आंदोलक मागण्यावर ठाम आहेत. दरम्यान, दोन दिवसांत तोडगा काढा अन्यथा रस्त्यावर उतरू, कार्तिकी वारीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येणार आहेत. त्यांना घेराव घालू, असे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, संघटक विजय रणदिवे यांनी इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com