सौर कृषिपंप योजना ऐच्छिक ः पाटणी

सौर कृषिपंप योजना ऐच्छिक ः पाटणी
सौर कृषिपंप योजना ऐच्छिक ः पाटणी

वाशीम : कृषिपंपाला अखंडित वीज मिळावी, या उद्देशाने शासनाने सौर कृषिपंप योजना अंमलात आणली आहे. शेतकऱ्यांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांना सौर कृषिपंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.  शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद पाहता कृषिपंपाकरिता देण्यात येणारी सौर वीजजोडणी हा विषय ऐच्छिक करण्यात यावा, अशी मागणी पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत ही सुधारणा केल्याचे त्यांनी सांगितले.  राज्य शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशीम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी. असे एकंदरीत एक हजार ३०० पंप मिळाले. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना साडेतीन किंवा साडेसात अश्व क्षमतेचे सौर कृषिपंप दिले जात. याकरिता शासनाकडून ९५ टक्‍के अनुदान देय आहे. तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ८५ टक्‍के अनुदान दिले जाते. तरीदेखील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी शेतकरी उदासीन दिसत होते. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी वीजजोडणीकरिता पैसे भरले त्यांच्याकडे सौर कृषिपंपाकरिता लागणारे अतिरिक्त पैसे नसून, त्यांचा विद्युत असलेला कल पाहता हा विषय शेतकऱ्यांसाठी सक्तीऐवजी ऐच्छिक असावा, अशी मागणी करण्यात आली होती.  सौर कृषिपंपांची सक्ती नको ः सावरकर दरम्यान सौर कृषी पंपाच्या मुद्यावर अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना सक्तीची न करता पारंपरिक पद्धतीने वीजजोडणी देण्यात यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेली आहे. राज्यात शेतीपंपास पारंपरिक वीजजोडणी देणे बंद करण्यात आली. त्याऐवजी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत विशेष अनुदानासह वीजजोडणी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सौर वीजजोडणीच्या पॅनेलची देखरेख, खर्च, परिरक्षण याबाबत शेतकऱ्यांची मानसिकता नसल्याने पारंपरिक वीजजोडणीसाठी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com