कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून वीजनिर्मिती

अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली ग्रामपंचायतीने ४० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे, पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायतीचा एकंदरीत कारभार आता सौरऊर्जेवर चालणार आहे.
Solar power generation of Kandli Gram Panchayat
Solar power generation of Kandli Gram Panchayat

अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली ग्रामपंचायतीने ४० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे, पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायतीचा एकंदरीत कारभार आता सौरऊर्जेवर चालणार आहे. 

ग्रामपंचायत क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, पथदिवे, पाणीपुरवठ्याची मागणी लक्षात घेता पारंपरिक ऊर्जास्रोत महागडा ठरणार आहे. त्यासोबतच पारंपरिक ऊर्जास्रोत उपलब्धतेच्या देखील भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कांडली ग्रामपंचायतीने सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा पर्याय अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने कांडली ग्रामपंचायतीने ४० किलोवॉट ऑनग्रीड सोलर सिस्टिम उपलब्धतेबाबचा प्रस्ताव तयार केला होता. 

जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातर्फे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला. कांडली ग्रामपंचायतीच्या या प्रस्तावाची दखल घेत महाऊर्जाकडून तांत्रिक सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले. पारेषण संलग्न हा सौर वीज प्रकल्प उभारण्यास महाऊर्जाने देखील संमती दिली आहे. वीज वितरण कंपनीकडून ना-हरकत प्रमाणपत्रास सहा मुद्यांवर माहिती मागवून सादर करण्यास महाऊर्जाकडून सांगण्यात आले आहे. 

कांडली ग्रामपंचायत आपल्या क्षेत्रातील वेगवेगळ्या सात ठिकाणी ऑनग्रीड सोलर सिस्टिम बसविणार आहे. यात ग्रामपंचायत कार्यालय मीटरवर दहा किलोवॉट, दत्तनगर, गोविंदनगर, वनश्री कॉलनी आणि रश्‍मीनगर विद्युत पथदिवे डीबी मीटरवर व गोदावरीनगर पाणी टाकी आणि दत्तनगर पाणी टाकीजवळील डीबी मीटरवर प्रत्येकी पाच किलोवॉटची सिस्टिम प्रस्तावित केली आहे. 

महावितरणच्या खांबांवर सहा कोटींचा कर 

सौरऊर्जेचा पर्याय अवलंबिणाऱ्या कांडली ग्रामपंचायतीने गावशिवारात असलेले महावितरणचे खांब, रोहित्र, वीज वाहिन्यांचे जाळे व इतर बाबींवर कर आकारणी केली आहे. तब्बल ६ कोटी ८६ लाख ८० हजार रुपयांचा कर आकारण्यात आला आहे. ३ हजार १५ वीज खांब, ५५ रोहित्र, १२ हजार मीटर वीज वाहिन्यांवर ही कर आकारणी करण्यात आली आहे. कर मागणीच्या रकमेचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांनी वरिष्ठांना पाठविला आहे. त्यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com