नंदुरबार जिल्हा परिषदेत सौरऊर्जा प्रकल्प

Solar Power Project at Nandurbar Zilla Parishad
Solar Power Project at Nandurbar Zilla Parishad

नंदुरबार : पारंपरिक ऊर्जा स्रोतांचे घटते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या कल्पकतेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पाला भेट देऊन त्यांनी तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. 

पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अतिवापर रोखण्यासाठी शासनाने विविध अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. यानुसार येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीला वीजेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. 

सर्व प्रकारच्या प्रशासकीय मंजुरीनंतर जिल्हा परिषद आवारातील वाहनतळाच्या छपरावर ५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत हा प्रकल्प उभारला आहे. 

जिल्हा परिषद इमारतीमधील चार मजल्यांत विविध १७ विभागांची कार्यालये कार्यान्वित आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची कार्यालये, दोन लहान व एक मोठे सभागृह आणि इतर अधिकाऱ्यांची कार्यालये या सर्वांमध्ये असलेल्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांना दररोज ६०० युनिट, तर प्रतिमाह सरासरी दहा हजार युनिट एवढ्या विजेचा वापर केला जातो. त्याअनुषंगाने प्राथमिकता म्हणून जिल्हा परिषदेने ५० किलोवॉट म्हणजेच स्वच्छ सूर्यप्रकाशात दररोज सुमारे दोनशे युनिट वीजनिर्मिती करू शकेल, अशा सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली आहे. 

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीला एक्‍स्प्रेस फीडरने गेल्या दोन वर्षांपासून नियमित वीजपुरवठा केला जात आहे. तसेच जनरेटरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर आता सौरऊर्जा प्रकल्पामुळे जिल्हा परिषद इमारतीला यापुढे पूर्णवेळ अखंड वीजपुरवठा सुरू राहणार आहे.  सुमारे  ३८ लक्ष रुपये खर्चाच्या या योजनेतून जिल्हा परिषद इमारतीचे प्रतिमहा सुमारे ५० हजार रुपये वीजबिल वाचणार असून, ऑन ग्रीड पद्धतीने बसविण्यात आलेल्या या सोलर रूफ टॉप सिस्टिममुळे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तयार होणारी अतिरिक्त वीज थेट वीज महामंडळाला पुरविली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com