agriculture news in Marathi sold tur step by step Maharashtra | Agrowon

तूर टप्प्‍याटप्प्याने विकण्याचे आवाहन 

अनिल जाधव
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍क्यांपर्यंत घट झाल्याने बाजारात आवक कमीच आहे. त्यामुळे राज्यात सरासरी दर ५८०० ते ६२०० रुपयांपर्यंत मिळत आहे. 

पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍क्यांपर्यंत घट झाल्याने बाजारात आवक कमीच आहे. त्यामुळे राज्यात सरासरी दर ५८०० ते ६२०० रुपयांपर्यंत मिळत आहे. मात्र समाज माध्यमांत ७१०० रुपये दराचे संदेश फिरत असून, हा दर उच्च गुणवत्ता व खूपच कमी मालाला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वेळी माल बाजारात न आणता टप्प्याटप्प्याने विकावा, असे आवाहन शेतीमाल बाजारातील जाणकारांनी केले आहे. 

तूर उत्पादनात यंदा मोठी घट आली आहे. त्याचा परिणाम राज्यातील बाजार समित्यांमध्ये दर वाढीवर झाला आहे. यंदा काही भागांत कमी लागवड झाली. तसेच तूर ऐन फुलोऱ्यात असताना झालेला पाऊस आणि बदलत्या वातावरणाने दाणा भरण्यावर परिणाम झाला. त्यामुळे शेंग दिसत असली, तरी आत दाणा कमी आहे. परिणामी, उत्पादकतेत मोठी घट होऊन बहुतांश भागात एकरी ५ ते ५.५ पोती होणारी तूर यंदा ३ ते ३.५ पोतीही झाली आहे. त्यामुळे शेतात पीक दिसत असले, तरी उत्पादकता घटल्याने उत्पादन कमी झाले आहे. 

सध्या बाजारात तुरीची आवकही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी अकोला आणि लातूर बाजार समितीत १५ हजार पोत्यांपर्यंत होणारी आवक यंदा ६ ते १० हजार पोत्यांपर्यंत आली आहे. त्यातच गुणवत्तेचा प्रश्‍न आहे. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या मालाला बाजारात सध्या चांगाल दर मिळत आहे. शुक्रवारी (ता. ५) अकोला येथे उच्चांकी ७१०० रुपायांचा दर मिळाला. मात्र हा दर चांगल्या गुणवत्तेच्या आणि खूपच कमी मालाला मिळाला. 

उच्चांकी दर ठरतोय ‘भुलभुलैया’ 
विदर्भातील काही बाजार समित्यांमध्ये तुरीला ७००० ते ७१०० रुपये दर मिळत असल्याच्या पावत्या समाज माध्यमांध्ये फिरत आहेत. मात्र हा दर उच्च गुणवत्तेच्या आणि खूपच कमी मालाला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात शुक्रवारी (ता. ५) तुरीचा सरासरी दर हा ५८०० ते ६४०० रुपायांच्या दरम्यान होता. समाज माध्यमांमध्ये दराच्या फिरणाऱ्या पावत्या या सर्वच मालाला मिळत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तर घसरलेल्या आवकेमुळे शेतकऱ्यांनी बाजारात तूर आणावी यासाठी जास्त दराच्या पावत्या व्हॉट्सॲपवर फिरवल्या जात आहेत, अशी चर्चा आहे. 

टप्प्याटप्याने विक्री करावी 
यंदा देशात एकूणच कडधान्याचे उत्पादन घटल्याने सर्वच कडधान्याचे दर वाढलेले आहेत. त्याचा लाभ तुरीलाही होत आहे. उत्पादनातील घटीमुळे समाज माध्यमांत सरसकट तुरीला सात हजारांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे संदेश फिरत आहेत. यामुळे बाजारात मालाची आवक वाढून दर दबावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदाच विक्री न करता टप्प्याटप्याने माल विकावा, असे आवाहन जाणकारांनी केले आहे. 

उत्पादनात घट 
यंदा तूर लागवडीपासूनच पावासाचा ताण, अतिवृष्टी आणि बदलत्या वातावरणामुळे संकटे आली. तूर ऐन फुलोऱ्यात असताना उत्पादन पट्ट्यात अतिवृष्टी आणि पाऊस झाला. तसेच अनेक भागांत सतत बदलते वातावरण होते. परिणामी, फुलोऱ्यातून दाणा भरण्याची प्रक्रिया प्रभावित झाली. त्यामुळे पिकाला शेंगा दिसत असल्या तरी दाणे कमी आहेत. राज्यात यंदा तूर उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे, बाजार विश्‍लेषक आणि व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

तूर दरवाढीला पोषक घटक 

  • देशातील कडधान्य उत्पादनात झालेली घट 
  • पाऊस, बदलत्या वातावरणामुळे उत्पादकता घटली 
  • तूर उत्पादकता एकरी ५ पोत्यांवरून ३.५ पोत्यांपर्यंत घसरली 
  • तूर उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज 
  • राजकीय अस्थिरतेमुळे म्यानमारमधील तूर आयात प्रभावित होण्याची शक्यता 
  • आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या किमती तेजीत 

प्रतिक्रिया
आमच्या भागात यंदा पेरणी कमीच होती. त्यातच उत्पादकता घटल्याने एकरी ३.५ पोत्यांपेक्षा अधिक उत्पादन मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून हीच स्थिती आहे. त्यातच उत्पादन खर्च वाढल्याने पीक आतबट्ट्याचे ठरत आहे. तूर पिकात यांत्रिकीकरणाला वाव दिल्यास शेतकऱ्यांना निश्‍चितच लाभ होतील. 
- गणेश सोमाणी, शेतकरी, अकोला 

गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक कमीच असून, सध्या ८ ते १० हजार पोती तुरीची होत आहेत. तुरीची उत्पादकता यंदा २० ते २५ टक्क्यांपर्यंत घटल्याचा हा परिणाम आहे. 
- अशोक अग्रवाल, तूर व्यापारी, लातूर 

उत्पादन कमी असल्याने बाजार समितीत ६ ते १० हजार पोत्यांची आवक होत आहे. शुक्रवारी ७१०० रुपये उच्चांकी दर मिळाला. 
- सुनील खटोड, तूर व्यापारी, अकोला 


इतर अॅग्रोमनी
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...
सोयाबीन पाच हजारांवरपुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली...
तूर टप्प्‍याटप्प्याने विकण्याचे आवाहन पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ...
शेतजमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...नवी दिल्ली ः शेतजमिनी भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...