पावसाने काहीसा दिलासा

पाऊस
पाऊस

पुणे: परतीच्या पावसाने ओढ दिल्यानंतर उन्हाचा चटका वाढल्याने दुष्काळात होरपळणाऱ्या अनेक भागांना पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. रविवारी (ता. ४) सायंकाळनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर, नाशिकमध्ये पावसाचा जोर अधिक होता. सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोले (जि. नगर) येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. हा पाऊस रब्बी पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे, तर काढणीयोग्य झालेल्या खरिपाच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. राज्यात रविवारी सकाळपासूनच ढग गोळा होऊ लागल्याने उकाडा वाढला होता, तर दुपारनंतर काळेकुट्ट ढग वाढून मेघगर्जना विजांसह पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरा पावसाचा जोर वाढला. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, तर विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. इतरही जिल्ह्यांच्या काही भागांत पावसाचा शिडकावा झाला. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नाशिक जिल्ह्यात सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. उशिरा पेरलेली खरीप पिके आणि सध्या लावणी सुरू असलेल्या रांगड्या कांद्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला, तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढविणारा आहे. अचानक झालेल्या पावसामुळे काढून ठेवलेले लालकांदा, मका ही पिके भिजल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. कांदा रोपांचे काही प्रमाणात नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील चिंचवे गाव येथील पांडुरंग केशव सावळे या शेतकऱ्याची म्हैस वीज पडून ठार झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सोनजांब, खेडगाव परिसरात गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षासह धान्य पिकांचे व टोमॅटोचे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजांचा कडकडाट व वाऱ्यासह आलेल्या या पावसाने, शेतामध्ये पाणी साचले होते. कोतूळ, आढळा, निळवंडे भागातही चांगला पाऊस झाला. संगमनेर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह रात्री दहाच्या नंतर पावसाचा जोर वाढला. कोल्हार घोटी राज्य मार्गावरील समनापूर ते कोकणगावपर्यंतचा परिसर जलमय झाला होता. जोर्वे परिसरातही सुमारे दीड ते दोन तास पाऊस सुरू होता. सातारा जिल्ह्यातील नागठाणे, बोरगाव (ता. सातारा) येथे सायकांळी सहाच्या सुमारास पावसाने मध्यम स्वरूपात हजेरी लावली, तसेच रामाचा डोंगर, बिटलेवाडी (ता. खटाव) परिसरातही पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील भोरगिरी (ता. खेड) भागात पावसाळी वातावरणामुळे, तसेच हलक्या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, भातकाढणीच्या कामांसाठी त्यांची धांदल उडत आहे. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ परिसरात रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह एक तास जोरदार पाऊस झाला. ऊस व ज्वारी पिकाला हा पाऊस उपयुक्त आहे. कांदा, बटाटा, आले आदी पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मावळ, मुळशी तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने शेतात कापून ठेवलेले व खळ्यात झोडणीसाठी रचून ठेवलेले भातपीक झाकण्याची संधीही शेतकऱ्यांना मिळाली नाही. भात खाचरे पाण्याने भरून वाहू लागल्याने काढून ठेवलेल्या भात पिकाला फटका बसणार आहे. मावळ तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिले आहेत. वऱ्हाडात वातावरणात अचानक बदल होत अकोला व बुलडाणा जिल्‍ह्यात काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह पावसाला सुरवात झाली. सध्या ज्वारी कापणी, मळणीची कामे सुरू असून, अचानक अालेल्या पावसामुळे एकच धावपळ झाली. उगवण झालेल्या हरभरा पिकासाठी हा हलका पाऊससुद्धा दिलासा देणारा बनला अाहे. अमरावती जिल्ह्यातही हलक्या पावसाचा शिडकावा झाला. सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्राेत- कृषी विभाग) : ठाणे : मुरबाड १५, धसई २३, देहारी २१, न्याहडी १३, सरळगाव १७. रायगड : पेण ३५, वाशी १३, कामर्ली २८. रत्नागिरी : चिपळूण ५२, खेर्डी ४८, वाहल ११, असुर्डे १५, कळकवणे ६०, शिरगाव ३५, खेड १०, शिर्शी १२, दाभील १८, पाटपन्हाळे २८, मंडणगड ११. सिंधुदुर्ग : अंबेरी २५, सावंतवाडी १५. नाशिक : वेहेळगाव ११, वरखेडा ४०, देवळा ४१, नगर : नालेगाव १०, केडगाव ११, पळशी १३, माणिकदौंडी १५, सोनाई ११, वडाळा २०, संगमनेर २६, धांदरफळ २०, अश्‍वी २२, शिबलापूर ३४, तळेगाव २०, समनापूर २५, घारगाव ४७, डोळासणे ४०, साकूर २१, पिंपरणे ३२, अकोले १५०, विरगाव २६, समशेरपूर ३९, सकीरवाडी ४८, राजूर ५८, कोतूळ ४०, ब्राह्मणवाडा २८, कोपरगाव ४१, रवांदे १७, पोहेगाव १६, राहता १४, लोणी ११, बाभळेश्‍वर १२, पुणतांबा २९. औरंगाबाद : शेंदूरवाडा १०, हर्सुल १९, सिद्धनाथ ५०, वैजापूर १५, खंडाळा ३५, बोरसर २४, महालगाव १०, लाडगाव २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com