ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला आमदार

ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला आमदार
ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला आमदार

सोलापूर ः कुणाचे नशीब कधी आणि कसे उघडेल, हे सांगता येत नाही. असेच काहीसे नशीब उघडले आहे, माळशिरस तालुक्‍याचे नुतन आमदार राम सातपुते यांचे. ज्या माळशिरस तालुक्‍यात त्यांच्या आई-वडलांनी ऊसतोडणी कामगार म्हणून एक-दोन नव्हे, तब्बल आठ वर्षे काम केले, त्याच तालुक्‍याचा आमदार होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी आले आहे. अर्थात, निवडणुकीच्या निकालातही त्यांना प्रत्यक्ष आयुष्यातील संघर्ष अनुभवायला आला. त्यांची त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराशी काट्याची टक्कर झाली. शेवटपर्यंत त्यांना हा क्षण हुलकावणी देतो की काय, अशी परिस्थिती होती. पण, शेवटी त्यांनी विजयश्री खेचून आणली आणि एक ऐतिहासिक नोंद झाली. 

मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील डोईठाण हे राम सातपुते यांचे गाव. या भागात सर्वाधिक ऊसतोड कामगारच आहेत. त्यापैकीच एक विठोबा सातपुते आणि जिजाबाई सातपुते हे ऊसतोड कामगार दांपत्य. त्यांचाच राम हा धाकटा मुलगा. राम यांना तीन बहिणी. तिघींचे विवाह झालेले. घरची परिस्थिती अत्यंत हलखीची असल्याने आणि जेमतेम असलेल्या कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. विठोबा आणि जिजाबाई सातपुते यांनी काही वर्षांपूर्वी माळशिरस तालुक्‍यातील सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या फडात आठ वर्षे उसतोडणीसाठी स्थलांतर केले. आपली परिस्थिती मुलाच्या शिक्षणाआड येऊ नये, यासाठी ते अविरत कष्ट करत राहिले. त्याचे फळ आज मिळाले.

एकुलता मुलगा असलेल्या राम यांना आई-वडलांनी अतिशय कष्टातून शिकवले. त्यासाठी पुण्याला पाठवले. राम यांनीही आई-वडलांचे हे कष्ट जवळून पाहिले, अनुभवले. पण संघटनकौशल्य आणि आपल्या हुशारीच्या बळावर राम यांनी आपली आणि आपल्या करिअरची वाट निवडली. ते थेट सामाजिक, राजकीय क्षेत्रात उतरले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री म्हणून ते काम करू लागले. 

सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची शिफारस माळशिरस विधानसभेसाठी केली. यामध्येच त्यांच्या कामाची चुणूक दिसून येते. ज्या तालुक्‍यात आपल्या आई-वडिलांनी ऊसतोड कामगार म्हणून काम केले. आज त्याच तालुक्‍याचा आमदार होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबात आले. यापेक्षा सर्वांत मोठा आनंद तो काय?   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com