दक्षिण भारतात पावसाचे थैमान; पुरात ३१ बळी; पश्‍चिम किनारपट्टीवर दोन दिवस ‘रेड अलर्ट'

दक्षिण भारतात पावसाचे थैमान; पुरात ३१ बळी; पश्‍चिम किनारपट्टीवर दोन दिवस ‘रेड अलर्ट'
दक्षिण भारतात पावसाचे थैमान; पुरात ३१ बळी; पश्‍चिम किनारपट्टीवर दोन दिवस ‘रेड अलर्ट'

तिरुअनंतपुरम ः दक्षिणेकडील केरळ, कर्नाटकध्ये पावसाने थैमान घातले असून, पूरस्थिती गंभीर आहे. केरळमध्ये बळींचा आकडा २२ पर्यंत पोचला आहे. कर्नाटकमध्ये पावसामुळे नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. अनेक जण बेपत्ता आहेत. बळींची संख्या वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. हवामान विभागाने केरळ, तसेच पश्‍चिम किनारपट्टीवर शुक्रवारी सकाळी ‘रेड अलर्ट' दिला आहे. तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यात पावसामुळे पूर आला आहे. मदतकार्यासाठी राज्य सरकारने हवाई दलाला विनंती केली आहे.  केरळ, कर्नाटकाचा सागरी व दक्षिण किनारा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे पुढील दोन दिवसांत मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या भागात पूरस्थिती असून अनेक नद्या धोक्‍याच्या पातळी ओलांडून वाहत आहे. अरबी समुद्र आणि पश्‍चिमी किनाऱ्यावर प्रतितास ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने मच्छीमारांना दिला आहे.  केरळात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने मदत व बचाव कार्यासाठी लष्कर आणि हवाई दलाची मदत घेत असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. मल्लपूरममध्ये दरड कोसळून ५० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आले. खराब हवामानामुळे तिथे मदतकार्यात अडथळा येत असल्याचे सांगण्यात आले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाड जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वायनाडमध्ये आतापर्यंत २६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुरामुळे रस्ते खचल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. मेप्पाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कुटुंबातील बेपत्ता सदस्य व नातेवाइकांच्या शोधासाठी नागरिकांची रीघ रुग्णालयांकडे लागली आहे.  कर्नाटकमध्ये मदतकार्य वेगात  कर्नाटकमधील पूरग्रस्त व मुसळधार पाऊस पडत असलेल्या भागातून एक लाखापेक्षा अधिक नागरिकांची आज सुटका केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला आहे. अग्निशामक दल आणि आप्तकालीन विभाग, राज्य आप्कालिन प्रतिसाद दल, राष्ट्रीय आप्तकालीन प्रतिसाद दल आणि लष्कराच्या संयुक्त मदत पथकांनी आतापर्यंत एक लाख २४ हजार २९१ लोकांना सुरक्षित स्थळी पोचविले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात पुरामुळे सर्वांत जास्त नुकसान झाले. सहा जणांचा मृत्यू झाला असून एक हजार ४१० किलोमीटरचे रस्ते आणि चार हजार १८ सरकारी इमारतींचे नुकसान झाले आहे. उत्तर कर्नाटक व किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह मालनाड, बागलकोट, विजापूर, रायचूर, यादगिरी, उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, शिमोगा, कोडगू आणि चिकमंगळूर जिल्हे पूरबाधित आहेत.  तमिळनाडूत निलगिरीला फटका  तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसाने पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार निलगिरीत धुवाधार पावासाने पूर आला असून, भूस्खलन होत आहे. जिल्ह्यात गुरुवारी ९११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बचतकार्यासाठी राज्य सरकारने हवाई दलाला विनंती केली आहे. पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना प्रत्ययेकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील मदतकार्यावर स्वतःच लक्ष ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री आर. बी. उदयकुमार आणि महसूल सचिव के. सत्यगोपाल यांना दिले आहेत. ‘एनडीआरएफ', ‘एसडीआरपीएफ' आणि लष्कराची पथके तैनात करण्यात आली आहेत.  केरळमधील स्थिती 

  •   नऊ जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा 
  •   एकूण ४४ नद्यांपैकी निम्म्या दुथडी भरून वाहत आहेत 
  •   राज्यात दरडी पडल्याच्या २४ घटना 
  •   सर्व शैक्षणिक संस्थाना सुटी जाहीर 
  •   एक लाख २४ हजार नागरिकांची सुटका करून त्यांनी निवारा केंद्रात हलविण्यात आले 
  •   कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी दुपारी तीन पर्यंत बंद राहणार आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com