‘ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात ज्वारी पेरा’

‘ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात ज्वारी पेरा’
‘ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात ज्वारी पेरा’

औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात संपवावी. पेरणी करताना सुधारित वाणांचा वापर करावा,’’ असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिला. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद-१ येथील सभागृहात मंगळवारी (ता. १) शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रम पार पडला. 

डॉ. झाडे म्हणाले, ‘‘रब्बी ज्वारी, करडई, हरभरा या पिकांची पेरणी केल्या जाणाऱ्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास बियाणे पेरणीवेळी प्रतिएकरी ४ किलो फोरेट जमिनीत पेरून द्यावे. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी एकरी चार किलो बियाण्यांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास ३०० मेश गंधकाची भुकटी चोळावी. त्यानंतर चार ते पाच मिलि इमिडाक्‍लोप्रिड किंवा ५ ते ६ मिली थायमिथॉक्‍झेम या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्यास खोडमाशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होते. सर्वांत शेवटी द्रवरूप जिवाणू संघ या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया सावलीत करून पेरणी करावी. पेरणीच्या वेळेस हेक्‍टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फूरद पेरून द्यावे.’’

‘‘ज्वारी अधिक करडई सहास तीन व हरभरा अधिक करडई सहास तीन या प्रमाणात आंतरपिकाचा वापर निखोळी पिकापेक्षा केल्यास अधिक आर्थिक नफा मिळू शकतो. जमिनीतील ओलावा व जमिनीचा प्रकार ओळखून करडई पिकाची लागवड केल्यास आर्थिक नफा चांगला मिळतो. करडईचे सुधारित वाण पीबीएनएस-१२(परभणी कुसूम)चा अवलंब करावा. हरभऱ्याची लागवड करताना सुधारित आकाश (बीडीएनजी -७९७)व काबूली हरभरा बीडएनजी-७९८ या वाणाचा अवलंब करावा,’’ असे आवाहन डॉ. झाडे यांनी केले.

‘‘कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या जवसाचे सुधारित वाण एलएसएल-९३ चा वापर करावा. पेरणीवेळी कोणत्याही बियाण्यांना बीजप्रक्रिया ही प्रथम बुरशीनाशक, कीटकनाशक आणि सर्वांत शेवटी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी़,’’ असेही डॉ. झाडे यांनी स्पष्ट केले.

‘एमएमबी’चे विभागीय व्यवस्थापक दत्ता इथापे, डॉ. अनिता जिंतूरकर यांनी मार्गदर्शन केले. शेती, शेतीपूरक व्यवसायाचा अवलंब करा, असे आवाहन पाटगावकर यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com