पुणे : रब्बीचा साडेपाच लाख हेक्टरवर पेरा

Sowing the rabbi on five lakh and 50 thousand hectares in Pune division
Sowing the rabbi on five lakh and 50 thousand hectares in Pune division

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर पुणे विभागात अनेक ठिकाणी खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हळूहळू थंडी वाढू लागल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पेरणीस सुरुवात केली आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत गहू, हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत पाच लाख ५६ हजार २८३ हेक्टरवर म्हणजेच सरासरी ३१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

यंदा उशिराने झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात जवळपास दीड लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केले असून खते, बियाण्यांचे वाटपही करण्यात आले आहे. आता अनेक ठिकाणी पेरणीने वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्हयात रब्बी ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.

पेरणी झालेल्या क्षेत्रावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कीड नियंत्रणाच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहेत. सततच्या अवेळी पावसामुळे काही ठिकाणी पीक पिवळे पडले आहे. गहू व मका पिकांची पेरणी सुरू झाली आहे. पेरणी झालेल्या हरभरा पिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाची सरासरीच्या चार लाख ६९ हजार ७८५ हेक्टरपैकी एक लाख ९१ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातही रब्बी ज्वारी, हरभरा, मका या पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी ज्वारी पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे कांदा पीक सडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ज्वारीची सरासरीच्या दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्टरपैकी एक लाख १० हजार ६५५ हेक्टर म्हणजेच ४५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही ज्वारी, गहू व हरभरा या पिकांच्या पेरणीची कामे सुरू आहेत. ज्वारीची एक लाख ९९ हजार ६१४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय पेरणीचे क्षेत्र (हेक्टर)

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्के
नगर ६,६७,२६१ २,०५,६५४ ३१
पुणे ३,९१,८९७ १,२४,९२० ३२
सोलापूर ७,२१,८७७ २,२५,७०९ ३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com