पुणे विभागात रब्बी हंगामात ६७ टक्के पेरण्या

sowing of rabbi season is 67 percent in Pune region
sowing of rabbi season is 67 percent in Pune region

पुणे : ‘‘रब्बी हंगामात उशिराने रब्बीच्या पेरण्या झाल्या. आत्तापर्यंत पुणे विभागात सरासरी १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी ११ हजार ८४हजार ९२३ हेक्टर म्हणजेच ६७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत आहेत. ज्वारीच्या पिकांची काढणी सुरू आहे’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा उशिराने झालेल्या पावसामुळे जमिनीत अधिक ओल आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या आहेत. रब्बी पिकांच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. रब्बीच्या पेरणीपासून पुणे विभागात सुमारे पाच लाख ९६ हजार ११२ हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे. परिणामी रब्बीच्या ज्वारी, गहू, हरभरा यासह सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यामध्ये हंगामातील ज्वारी पीक कणसामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर, काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने गहू पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गहू पिकांवर काही ठिकाणी अल्प प्रमाणात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. हरभरा पीक फुलोरा ते घाटे येण्याच्या अवस्थेत आहे. पीक परिस्थिती समाधानकारक असून काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकांची एक लाख ५५ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तिच्या काढणीस सुरुवात झाली आहे. हरभरा पीक घाटे पक्वतेच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी हरभरा पिकांच्या काढणीस सुरुवात झाली आहे. गहू पीक ओंब्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. मका, कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

सोलापूर जिल्हयात ज्वारी पीक चांगल्या अवस्थेत आहे. हे पीक काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. जिरायती ज्वारी पिकांस पाण्याची आवश्यकता असून बागायत ज्वारी पिकांची वाढ जोमदार आहे. काही ठिकाणी ज्वारीवर अल्प प्रमाणात माव्याच्या प्रादुर्भावामुळे चिकटा पडला आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असून काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकांची वाढ चांगली असली, तरी अल्प प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  

जिल्हानिहाय रब्बी पेरणी (हेक्टरमध्ये) 

जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी  टक्के
नगर ६,६७,२६१ ४,६७,८४७ ७०
पुणे ३,९१,८९७ २,४७, ०९५ ६३
सोलापूर ७,२१,८७७ ४,६९,९८१ ६५
एकूण १७,८१,०३५ ११,८४,९२३ ६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com