पावसाअभावी पेरण्या रखडल्या

​उशिरा पाऊस आल्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस सोयाबीन, मुगाची पेरणी केली. परंतु, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. चार एकरवर सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. - अरुण जाधव, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड.
पाऊस उघडीप
पाऊस उघडीप

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले. या तीन जिल्ह्यांत सोमवारपर्यंत (ता. १५) सरासरीच्या तुलनेत ३९.७८ ते ५१.७ टक्केच पाऊस झाला. पावसाचे अल्प प्रमाण आणि असमान वितरण, यामुळे अजूनही अनेक मंडळांमध्ये खरीप पेरण्या झालेल्या नाहीत. पिकांच्या वाढीसाठी पुरेसा ओलावा नसल्यामुळे उगवू लागलेली पिके करपून जात आहेत. अनेक मंडळांमध्ये शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. परंतु, पावसाअभावी उगवण होत नसल्याचे चित्र आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवारपर्यंत २८७.०९ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात १२७.४८ मिलिमीटर (४४.४० टक्के) पाऊस झाला. अनेक मंडळात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा ८ लाख २४ हजार ८२० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. परंतु, प्रत्यक्षात ५ लाख ६४ हजार २६० हेक्टरवर (६६.४७ टक्के) पेरणी झाली. देगलूर, मुखेड, कंधार, नायगाव, लोहा आदी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे.   परभणी जिल्ह्यात अपेक्षित २३१.३२ मिलिमीटरच्या तुलनेत प्रत्यक्षात ११८.१६ मिलिमीटर (५१.०७ टक्के) पाऊस झाला. ५ लाख २१ हजार ८७० हेक्टरपैकी आतापर्यंत ३ लाख ६५ हजार हेक्टरवर (६९.९४ टक्के) पेरणी झाली आहे. दुष्काळी पालम, सेलू, पूर्णा, जिंतूर तालुक्यांसह अन्य तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये पेरण्या रखडल्या  आहेत. कपाशीची उगवण व्यवस्थित न झाल्यामुळे दुबार- तिबार लागवड करावी लागली. हिंगोली जिल्ह्यात अपेक्षित ३२१.९८ मिलिमीटरपैकी १२८.०७ मिलिमीटर (३९.७८ टक्के) पाऊस झाला. वसमत तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा ३ लाख ४८ हजार १९८ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ९६ हजार २२६ हेक्टरवर पेरणी झाली. पावसास विलंब झाल्यामुळे हळद लागवडीस उशीर झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट निश्चित आहे. पावसाअभावी पाणीटंचाई, चाराटंचाईची समस्या कायम आहे. या तीन जिल्ह्यांत दोनशेहून अधिक टॅंकर सुरू आहेत. प्रतिक्रिया आमच्या परिसरातील हतनूर, खेरडा, डिग्रस, साळेगाव आदी गावांमध्ये अजून पाऊस झालेला नाही. पाण्याच्या उपलब्धतेनुसार ठिबकवर कपाशीची लागवड केली. परंतु, कोरडवाहू क्षेत्रात अजून पेरणी नाही. - विजय काष्टे, काजळी रोहिणा, ता. सेलू, जि. परभणी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com