पावसामुळे वऱ्हाडात पेरण्यांनी घेतला वेग

पावसामुळे वऱ्हाडात पेरण्यांनी घेतला वेग
पावसामुळे वऱ्हाडात पेरण्यांनी घेतला वेग

अकोला ः मागील आठवड्यात अनियमित का असेना परंतु पावसाने हजेरी दिल्यामुळे वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत पेरणीने वेग घेतला. जुलैचा पहिला आठवडा लोटल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. वाशीम जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अकोल्यात पेरण्या मध्यंतरी रखडल्याने हे लागवड क्षेत्र आता ४० टक्क्यांवर पोचले आहे. बुलडाण्यातही सार्वत्रिक पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. सोयाबीन व कापूस या दोन पिकांचे क्षेत्र याहीवेळी अधिक आहे.

संपूर्ण जून महिन्यात पेरणीलायक पावसाअभावी सार्वत्रिक स्वरूपात पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, जुलै सुरू झाल्याने व हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली.

अकोला जिल्ह्यात चार लाख ८० हजार हेक्टरपैकी १ लाख ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र लागवडी खाली आहे. वाशीम जिल्ह्यात लागवड क्षेत्र ७० टक्क्यांवर पोचले आहे. बुलडाण्यात ५० टक्क्यांपर्यंत लागवड झाली आहे. तीनही जिल्ह्यांमध्ये लागवड झालेले क्षेत्रावरील पिके अंकुरले आहेत. शेतकऱ्यांकडून आंतर मशागतसुद्धा केली जात आहे. शेतीतील कामे वाढल्याने मजुरांची मागणीसुद्धा दिवसागणिक वाढत आहे. 

सार्वत्रिक पावसाची गरज पावसाळ्याचा एक महिना लोटला. जुलैचा पहिला आठवडासुद्धा आता पूर्ण झाला. मात्र या विभागात सार्वत्रिक पाऊस पडलेला नाही. तीनही जिल्ह्यांचा विचार केला तर अकोल्यात मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, वाशीममध्ये मानोरा, कारंजा, बुलडाण्यात देऊळगावराजा, लोणार, मलकापूर या तालुक्यांना जोरदार व सार्वत्रिक पावसाची गरज आहे. आजवरच्या पावसामुळे प्रकल्पांनाही फारसा फायदा झालेला नाही. काही अंशी पाणीटंचाईची तीव्रता घटली. तरीही शुक्रवार (ता. ५) अखेर बुलडाण्यात १९७, अकोल्यात ३२ आणि वाशीममध्ये ६२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com