मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
गहू, हरभरा पेरणीला वेग
यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व हरभऱ्याच्या पेरण्या वेगाने होत आहेत. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही पिकांचा आतापर्यंत दुपटीपेक्षा अधिक पेरा केला आहे.
पुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व हरभऱ्याच्या पेरण्या वेगाने होत आहेत. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही पिकांचा आतापर्यंत दुपटीपेक्षा अधिक पेरा केला आहे. तर रब्बीची आतापर्यंत २२.३३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. राज्यात ५१ लाख हेक्टरवर रब्बी हंगामाचा पेरा होतो.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, सर्व पिकांचा आतापर्यंतचा पेरा २२.३३ लाख हेक्टरवर (४३.६२ टक्के) झाला आहे. चालू आठवड्यापर्यंत हरभऱ्याचा पेरा सव्वाआठ लाख हेक्टरपर्यंत पोहोचला. गेल्या हंगामात याच कालावधीत शेतकऱ्यांनी फक्त साडेतीन लाख हेक्टरपर्यंत हरभरा पेरला होता. गव्हाचा पेरा गेल्या हंगामात या कालावधीत फक्त ६५ हजार हेक्टरवर होता. यंदा हाच पेरा दीड लाखाच्या आसपास गेला आहे.
हरभऱ्यासाठी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर हा कालावधी पेऱ्यासाठी योग्य मानला जातो. मात्र यंदा थंडी चांगली राहण्याच्या आशेमुळे शेतकरी यापुढेही पेरा चालूच ठेवतील, असा अंदाज आहे. बागायती भागातील शेतकरीदेखील हरभऱ्याला पसंती देत आहेत.
दरम्यान, गव्हाचा उशिरा पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता दोन ओळींतील अंतर सात इंचांवरच मर्यादित ठेवावे. कारण उन्हामुळे फुटवे फुटण्यास अडचणी येतील. त्यातून उत्पादकता घटू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
रब्बीत पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता
मक्याचा पेरादेखील दमदारपणे होत आहे. साडेआठ लाख हेक्टरवर मका, तर ज्वारीचा पेरा ११ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. ‘‘राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पिकांचा पेरा वाढण्यास वाव आहे. गव्हाचा पेरा गेल्या हंगामाच्या तुलनेत किमान दोन ते अडीच लाख हेक्टरने वाढू शकतो,’’ असे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्यातील रब्बी पेरणीची स्थिती (२३ नोव्हेंबरअखेर) (हेक्टरमध्ये) (बदल टक्के)
पीक | सरासरी क्षेत्र | २०१९-२० | २०२०-२१ | बदल |
ज्वारी | २०,२७,२५८ | १०,२३,१६३ | ११,११,९६० | १०८.६८ |
गहू | ८,७५,६३३ | ६४,३४४ | १,४७,६४९ | २२९.४७ |
मका | २,६३,८९६ | ४५,८९६ | ८४,६४३ | १८४.४२ |
हरभरा | १७,४३,२५९ | ३,६१,०६९ | ८,३८,८०३ | २३२.३१ |
करडई | ४६४६५ | ४३९६ | ६६८७ | १५२.११ |
जवस | १६,६६९ | ३१२ | १,७८६ | ५७२.४१ |
तीळ | १६३० | २० | ९७६ | ४८८२.२५ |
सूर्यफूल | १४,४१६ | ८७२ | ९८३ | ११२.७४ |
(स्रोत ः कृषी आयुक्तालयातील सांख्यिकी विभाग)
प्रतिक्रिया
रब्बी हंगामासाठी यंदा स्थिती अनुकूल असली, तरी शेतकऱ्यांनी २० नोव्हेंबरनंतर साधारण गव्हाच्या जातीची लागवड करू नये. कारण त्यामुळे उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटते. उशिरा लागवडीसाठी ‘फुले समाधान’ व ‘पीडीकेव्ही सरदार’ याच दोन जाती उपलब्ध आहेत. त्यांची लागवड २० डिसेंबरपर्यंत करता येईल.
— डॉ. सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ, कृषी संशोधन केंद्र (निफाड)
- 1 of 1504
- ››