मराठवाड्यात सोयाबीन,कपाशीला पावसाच्या खंडाचा फटका

पावसाच्या खंडाचा पिकांना फटका
पावसाच्या खंडाचा पिकांना फटका

औरंगाबाद   : यंदा पावसाळ्याची सुरवात चांगली झाली. मात्र जून मध्य ते ऑगस्टदरम्यान पावसाच्या खंडाला सामोरे जावे लागले होते. सध्या पुन्हा एकदा मराठवाड्यातील पिकांना पावसाच्या खंडाचा सामना करावा लागत आहे. जवळपास २२ ऑगस्टपासून मराठवाड्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेंग अवस्थेत असलेले सोयाबीन व बोंड अवस्थेत असलेल्या कपाशीवर संकटाचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा एकदा आकाशाकडे लागल्या आहेत.

सर्वसाधारण पावसाच्या प्रमाणानुसार मराठवाड्यात ७७९ मिमी. पाऊस पडतो. पावसाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १ जून ते ११ सप्टेंबरअखेरपर्यंत सरासरी ६०४.६९ मिमी. पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या कालावधीत केवळ ४७७.८७ मिमी. अर्थात वार्षिक सरासरीच्या ६१.३४ टक्‍के पावसाची नोंद झाली.

सरासरी पाऊस ६० टक्‍क्‍यांपुढे दिसत असला, तरी प्रत्यक्षात मराठवाड्यातील ७६ पैकी ४५ तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या ६० टक्‍केही पाउस झालेला नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८, जालन्यातील ४, परभरणीमधील ८, नांदेडमधील ३, बीडमधील १०, लातूरमधील ५; तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ तालुक्‍यांचा समावेश आहे. या ४५ तालुक्‍यांपैकी १९ तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४, जालन्यातील १, नांदेडमधील १, बीडमधील ८, लातूरमधील १; तर उस्मानाबाद  जिल्ह्यातील ४ तालुक्‍यांचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा व भूम, बीडमधील गेवराई व शिरूर कासार; तसेच नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्‍यात तर वार्षिक सरासरीच्या ४० टक्‍केही पाऊस झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होणाऱ्या खुलताबाद तालुक्‍यात केवळ ४० टक्‍केच पाउस झाला आहे. १६ ते २२ ऑगस्टदरम्यान मराठवाड्यात पाउस झाला; परंतु २३ ऑगस्टपासून पुन्हा पाउस गायब झाला आहे.

गतवेळच्या खंडात ढगाळ वातावरण होते. यावेळी मात्र उन्हाचेही चटके बसताहेत. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो आहे. बोंडे लागण्याच्या अवस्थेत असलेली कपाशी व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनला या खंडाचा मोठा फटका बसणार हे जवळपास स्पष्ट आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com