सोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायम
सोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायम

सोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायम

सोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या मंदीचेच वातावरण कायम असून, नजीकच्या भविष्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोयाबीनच्या बाबतीत मोठ्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. तर हरभरा आणि तुरीचे दर हमीभावापेक्षा कमीच असून, सरकारी खरेदीशिवाय शेतकऱ्यांपुढे अन्य पर्याय दिसत नाही.  सोयाबीनमध्ये अनिश्चितता अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) सुरू झाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारावर मोठे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीन, सोयापेंडीवर आयात शुल्क लावल्यामुळे भारतीय सोयाबीनला फायदा होईल, अशी   काही जणांची धारणा आहे. परंतु भारतात सध्या सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या तुलनेत चढे अाहेत. या वाढीव दरामुळे चीनच्या बाजारपेठेत शिरकाव करणे किफायतशीर ठरणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे.   तसेच चीन, अमेरिकेसह अजून कोणकोणत्या देशांच्या शेतीमालावर आयात शुल्क लावेल याविषयी अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. त्या यादीत भारताचाही समावेश झाल्यास परिस्थिती आणखीन अवघड होऊन बसेल. चीनने भारतीय सोयापेंडेवर घातलेले निर्बंध उठवावेत म्हणून राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार सध्या चीनच्या दौऱ्यावर असून भारत चीनला सोयाबीन, साखर आणि इतर शेतमालाचा पुरवठा करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. परंतु या प्रयत्नांना चीन कसा प्रतिसाद देतो, यावर पुढचे चित्र अवलंबून आहे. तसेच चीनची सोयापेंडेची मागणी प्रचंड असून ती पूर्ण करण्यात भारताला किती यश मिळेल, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच मॉन्सून चांगला राहण्याचा अंदाज हवामानविषयक संस्था वर्तवत असल्यामुळे त्याचाही बाजारावर मनोवैज्ञानिक परिणाम होणार. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. सध्या ३८०० ते ३९०० रुपये क्विंटल दर चालू असून, शेतकऱ्यांनी या किंमत पातळीला माल विकून टाकणे फायद्याचे राहील. तूर, हरभऱ्यात सुधारणा नाही मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजनेतून हरभरा वगळला आहे; तसेच तिथे हमीभावाने २१ लाख टन हरभरा खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही निर्णयांमुळे महाराष्ट्रासह देशातील प्रमुख हरभरा उत्पादक राज्यांमध्ये हरभऱ्याचे दर वाढण्याचा अंदाज वर्तवला जात होता. परंतु या निर्णयांचा बाजारावर अपेक्षित परिणाम झालेला दिसत नाही. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी खुल्या बाजारातून हरभरा खरेदी सुरू केलेली आहे. परंतु तरीसुद्धा हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली नाही. सध्या हरभऱ्याला ३४०० ते ३५५० रुपये क्विंटल दर मिळत असून ते हमीभावापेक्षा ८५० ते १००० रुपयांनी कमी आहेत.  तुरीला सध्या सरासरी प्रति क्विंटल ४१०० रुपये दर मिळत आहे. हमीभाव ५४५० रुपये आहे. तुरीच्या दरात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत; परंतु दरात मोठी घट होण्याचीही शक्यता नाही. एकंदर हरभरा आणि तूर हमीभावाने सरकारी खरेदी केंद्रांवर विकणे याशिवाय शेतकऱ्यांपुढे सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाही. (लेखक शेतीमाल बाजार विश्लेषक असून, प्रो इंटेलिट्रेड सर्व्हिसेसचे संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com