दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन दराने घात

मी चार एकरात सोयाबीन व तूर अशी लागवड केली होती. यात ४ क्विंटल ७७ किलो सोयाबीन झाली. यातील दोन दिवसांपूर्वी खामगाव बाजारात दोन क्विंटल ७७ किलो सोयाबीन विकली. क्विंटलला दोन हजार रुपये भाव मिळाला. -वासुदेव नामदेव मुके , नायगाव देशमुख, जि. बुलडाणा
दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन दराने घात
दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन दराने घात

अकोला : मूग, उडदापाठोपाठ आता सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात येणे सुरू झाले आहे. आवकेला नुकती सुरवात झाली असताना दरांमध्ये कमालीची घसरण सुरू झाली आहे. सोयाबीनची खरेदी अवघी दोन ते २२०० रुपयांपासून केली जात असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोरील संकटांमध्ये वाढ झाली. वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या याच दरांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत.

वऱ्हाडात सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाल्याने सोयाबीनचा दर्जा काहीसा खालावला आहे. त्यामुळे अकोला, खामगाव, वाशीम अशा सर्वच महत्त्वाच्या बाजारात शनिवारी सोयाबीन अवघी २२०० ते २८०० रुपयांदरम्यान विकल्या गेली. सोयाबीनला सध्या सरासरी २४०० ते २५०० रुपये दर मिळत आहे.

काही ठिकाणी तर अवघी दोन हजार रुपयांपासून मागणी व्यापारी करीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजार असलेल्या खामगाव बाजारपेठेत सोयाबीनचा दर शनिवारी २२०० ते २७६० होता. तत्पूर्वी शुक्रवारी (ता. १३) केवळ १९०० रुपये दराने या सोयाबीनची खरेदी केल्या गेली.

सुरवातीला पावसाचा खंड पडल्याने फुलोरावस्थेत मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना अगदी एकरी दोन ते चार क्विंटलपर्यंत उतारा येत आहे. या सोयाबीनला सरासरी २२०० रुपये दर गृहीत धरला तर एकरी साडेआठ ते नऊ हजार रुपयांपर्यंत उत्पादन होत आहे. वास्तविक सोयाबीनला एकरी सोंगणी खर्चाचे प्रमाण वाढले आहे.

याशिवाय मळणीचे १५० रुपये पोते प्रमाणे द्यावे लागतात. तसेच यापूर्वी लागवड खर्च, बियाणे, खते, दोन ते तीन फवारण्या यामुळे एकरी उत्पादन खर्च आताच्या मिळकती एवढाच झालेला आहे. या परिस्थितीमुळे सोयाबीन पिकापासून नफा तर सोडा उलट तोटाच पदरात पडत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.  

अकोला बाजार समितीतील दर
तारीख किमान कमाल दर
१४ सप्टेंबर २७०० २८४५
२९ सप्टेंबर २५५० २८४५
१३ ऑक्‍टोबर २२०० २८००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com