सुगीच्या तोंडावरच सोयाबीन दरावर सटोडियांचा दबाव

बाजारातील दरात सध्या चढ-उतार आहे. तसे कारण ठोस नसतानाही हंगामाच्या प्रारंभी दर पडणे योग्य नव्हते. मात्र, काल काही प्रमाणात यात सुधारणा झाली. शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणताना संयमाने घेणे आवश्‍यक आहे. दोन महिन्यांत दरात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. - अशोक भुतडा, चेअरमन, कीर्ती गोल्ड, लातूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यात सोयाबीनची सोंगणी सुरू असतानाच बाजारात दरावर सटाेडियांचा दबाव दिसून येत आहे. आठवड्यापूर्वी ३९०० रुपयांपर्यंत असलेले सोयाबीनचे दर सध्या हमीभावापेक्षाही २०० ते ५०० रुपये कमी असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असली, तरी खरेदी केंद्रांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ बाजारात सोयाबीन आणू नये, टप्प्या-टप्प्याने विकावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.  

राज्यात कापसानंतर सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. यंदा सोयाबीनचे ४० लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, कमी पाऊस, खंड आणि उशिराची पेरणी या प्रमुख कारणांनी यंदा सोयाबीन उत्पादकता कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी ३०५० रुपये हमीभाव होता.

यंदा त्यात ३४९ रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. अशातच सध्याचे दर ३३९९ या हमीभावापेक्षाही कमी असल्याने खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनला ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. महाराष्ट्रात मात्र याविषयी कोणतीही हालचाल नाही. सोयाबीनच्या घटत्या दरात गुरुवारी (ता.४) हलकी ४० रुपये सुधारणा झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले असले, तरी अद्यापही हमीभावापासून शेतकरी दूर आहे.

नाफेडकडून होणाऱ्या खरेदीबाबत राज्य सरकारने १ ऑक्‍टोबर ते ३१ ऑक्‍टोबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. सोयाबीन खरेदीसाठी २०० केंद्र सुरू करण्याची प्रस्तावित आहे, मात्र ऑनलाइन प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा जाचक नियम अटींबाबत सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

केंद्र सरकारकडून यापूर्वी तेलबिया दरांना संरक्षण मिळावे म्हणून खाद्यतेल आयातीवरील शुल्कात ७.५ टक्‍क्‍यांहून ३८.५ टक्‍क्‍यांपर्यंत गेल्या वर्षी भरीव वाढ करण्यात आली, त्याचा दीर्घ काळात चांगला परिणाम बाजार दरावर झाला. सोयामील निर्यातीला अनुदान ५ टक्‍क्‍यांवरून १० टक्के करण्यात आल्याने प्रोत्साहनही देण्यात आले, याशिवाय यंदा चीनही मोठ्या प्रमाणात सोयामील खरेदी करण्याची शक्‍यता आहे.

बांगलादेशमार्गे होणाऱ्या आयातीवर प्रतिबंध लावण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही ऐन हंगामाच्या तोंडावर सोयाबीन दरात गेल्या आठवड्यातील घसरण काही कंपन्या आणि सटोडियांचा खेळ असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. तसेच, राज्यातील सर्वाधिक पीक असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांस बाजार संरक्षण देण्यासाठी सरकारने तत्काळ हस्तक्षेप करण्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

शेतीमाल तारण योजनेचा लाभ घ्या : पणनमंत्री शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणण्याची घाई करू नये. ज्यांना तत्काळ गरज आहे, त्यांनी राज्य सरकारच्या शेतीमाल तारण योजनेचा लाभ  घ्यावा. येथे यास ६ टक्के व्याज आहे, मात्र ७५ टक्के मोबदला मिळतो. सध्या सोयाबीन खरेदीकरिता नोंदणी सुरू झाली आहे, महिन्यानंतर केंद्र सुरू होतील. सर्व बाजार समित्यांनी शेतीमाल तारण योजना राबवावी. ज्यांकडे निधी नसेल, त्यांना `पणन` निधी देईल. याबाबत कोणतीही तक्रार खपून घेतली जाणार नाही, वेळप्रसंगी कारवाई करु, असा इशारा सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.   सोयाबीन लगेच बाजारात आणू नका : पाशा पटेल सोयाबीन दरात सुधारणांसाठी आवश्‍यक ती पावले उचलून गेल्या वर्षी आयात शुल्क आणि निर्यात अनुदानात भरीव वाढ केंद्र सरकारने केली आहे. याशिवाय चीनच्या कॉन्सोलेट जनरल बरोबर नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोयामील खरेदी संदर्भात बोलणी झाली आहे. इराणबरोबरही बोलणे सुरू आहेत. नॉन जीएम म्हणून भारतीय सोयामीलला अधिक पसंती आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. सोयाबीनला हमीभावापेक्षाही दर जास्त मिळतील, ४००० पर्यंतही जाण्याचे संकेत आहेत. एकदम माल बाजारात आल्याने भाव तुटतात. यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ माल बाजारात आणू नये. या मालात आर्द्रता अधिक असल्याने दर कमी मिळतो. ज्यांना गरज असेल, त्यांनी तेवढेच विकावे, तसेच हमीभावाकरिता सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी करावी. दोन महिन्यांत बाजारातील दरात सुधारणा आहे, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. बाजारातील दरात सध्या चढ-उतार आहे. तसे कारण ठोस नसतानाही हंगामाच्या प्रारंभी दर पडणे योग्य नव्हते. मात्र, काल काही प्रमाणात यात सुधारणा झाली. शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणताना संयमाने घेणे आवश्‍यक आहे. दोन महिन्यांत दरात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. - अशोक भुतडा, चेअरमन, कीर्ती गोल्ड, लातूर.

सोयाबीन दृिष्टक्षेपात...

  •  यंदाचा हमीभाव (क्विं) : ३३९९ रुपये
  • आॅनलाईन नोंदणी : १ ऑक्‍टोबर ते ३१ ऑक्‍टोबर
  •  प्रस्तावित खरेदी केंद्र : २००
  • मध्य प्रदेशात बोनस : ५०० रु./प्रति क्विंटल
  • सोयाबीनचे गुरुवारचे (ता.४) (दर : क्विंटल)
    बाजार किमान  कमाल सर्वसाधारण दर
    जळगाव २८५०  २९५५ २९००
    लातूर २९२० ३०५०   २९८०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com