सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाही

सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाही
सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाही

देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३५०० ते ३५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते चार हजारांच्या पातळीला जातील, या आशेने बराच माल साठवून ठेवला आहे. परंतु नजीकच्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. विशिष्ट परिस्थितीत सोयाबीनच्या दरात जास्तीत जास्त ५० ते १०० रुपयांची वाढ होऊ शकते. त्या दरपातळीला शिल्लक सोयाबीन विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. तेजीच्या अपेक्षेने माल तसाच शिल्लक ठेवला तर तोटा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदा सोयाबीनच्या दरात मोठे चढ-उतार दिसून आले. मध्यंतरीच्या काळात सोयाबीन किमान आधारभूत किमतीच्या (हमीभाव) खाली गेल्याने सरकारी खरेदीची वेळ आली. अर्थात सरकारी खरेदीचे प्रमाण अत्यंत तोकडे राहिले. नंतरच्या टप्प्यात सोयाबीनच्या दरात सुधारणाही झाली. व्यापाऱ्यांनी मालाचा तुटवडा पडेल, या आशंकेने खरेदीसाठी जोर लावला होता. त्याचाही मोठा परिणाम बाजारावर दिसला. परंतु आता तुटवड्याची शक्यता संपली आहे. तसेच यंदा मॉन्सूनचे आगमन आणि पावसाचे प्रमाण याविषयी सकारात्मक अंदाज असल्याने येत्या खरिपात सोयाबीनचा पेरा चांगला राहील, अशी भावना बाजारात आहे. या सगळ्या घटकांचा परिणाम म्हणून आता लगेच सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता अंधुक आहे.  येत्या खरिपात शेतकरी सोयाबीनलाच पसंती देतील असे सध्याचे चित्र आहे. कापसाच्या दरात सध्या तेजी असून आंतरराष्ट्रीय बाजारातही दर चढे आहेत. त्यामुळे येत्या खरिपात कापसाची लागवड करणे किफायतशीर ठरायला पाहिजे. परंतु गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीमुळे पीकसंरक्षणचा खर्च वाढला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बोंड अळीची समस्या आणि बीटी बियाण्यांची कमी झालेली परिणामकारकता यावर अद्याप उपाय सापडलेला नाही. त्यामुळे दरात तेजी असूनही शेतकरी कापूस लागवडीची जोखीम कितपत पत्करतील, याविषयी बाजारात संभ्रम आहे. तसेच तूर, मूग, उडीद या प्रमुख खरीप कडधान्यांचे दर घसरल्याने ही पिके सरत्या हंगामात शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली नाहीत. या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या सध्याच्या हमीभावात केंद्र सरकारने १०० ते २०० रुपयांची वाढ केली तरी हमीभाव प्रतिक्विंटल ३१५० ते ३२५० रुपयांच्या दरम्यान राहतील. आजच्या परिस्थितीचा विचार करता हा हमीभाव शेतकऱ्यांसाठी आकर्षक ठरेल. त्यामुळे राज्यात सोयाबीनकडेच शेतकऱ्यांचा ओढा राहण्याची चिन्हे आहेत.

  • सोयाबीनच्या दरात मोठ्या तेजीची शक्यता नाही. प्रतिक्विंटल चार हजारांची पातळी गाठणे अवघड.
  • सध्याच्या दरात ५० ते १०० रुपयांपेक्षा अधिक वाढ होणार नाही.
  • तेजीच्या अपेक्षेने माल साठवून ठेवणे तोट्याचे ठरेल.
  • येत्या खरिपात सोयाबीनच्या हमीभावात १०० ते २०० रुपये वाढ होण्याची शक्यता.
  • कापूस आणि कडधान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांची पसंती सोयाबीनलाच राहण्याचा अंदाज.
  • (लेखक शेतीमाल बाजार विश्लेषक असून प्रो इंटेलिट्रेड सर्व्हिसेसचे संचालक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com