मराठवाड्यात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनसह पिके संकटात

दोन वेळा पडलेला पावसाचा मोठा खंड व चटका देणाऱ्या उन्हामुळे जमिनीतील ओल तुटली. विहिरी अजूनही उपस्यावरच आहेत. मूग, उडिदाचे उत्पादन एकरी ५० किलो ते १ क्‍विंटलपर्यंतच मिळाले. कपाशीची पातेगळ, फूलगळ वाढली. हाताशी आलेलं पीक जातं की काय, अशी स्थिती आहे. -निवृत्ती घुले, वखारी, जि. जालना.
पावसाअभावी सोयाबीन पिक सूकून चालले आहे
पावसाअभावी सोयाबीन पिक सूकून चालले आहे

औरंगाबाद : पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यातील सोयाबीन पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेले सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असतानाच जवळपास २२ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. पावसाच्या खंडामुळे कपाशीची पातेगळ, फूलगळ वाढली असून, रस शोषक किडींचाही प्रादूर्भाव वाढल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

मराठवाड्यात यंदा ऊस वगळता ४८ लाख १ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित होते. त्या तुलनेत ४६ लाख ८६ हजार २१४ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली असून, त्यापाठोपाठ कपाशीची लागवड झाली आहे. पेरणी झालेल्या खरीप पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कारळ, सूर्यफूल, कपाशी आदी पिकांचा समावेश आहे. मका, मूग, उडीद, सोयाबीन वगळता इतर पिकांची सर्वसाधारण क्षेत्रावरही पेरणी झालेली नाही.

यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी प्रथमच सोयाबीनला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा सोयाबीनच्या सर्वसाधारण १२ लाख ३४ हजार हेक्‍टर असून, त्या तुलनेत १८ लाख ४८ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, दुसऱ्यांदा पावसाच्या खंडाचा सामना करावा लागल्याने जमिनीतील ओल तुटली आहे. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडून त्यांची पानगळ होते आहे. रस शोषक किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला असून, कपाशीची पातेगळ, फूलगळ वाढली आहे. मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाच्या ओढीमुळे त्यास मोठा फटका बसतो आहे.

समाधानकारक पाऊस न झाल्याने उपशावरील विहिरींना अजून मुबलक पाणीच आलेले नाही. शेतकऱ्यांच्या पीक वाचविण्याच्या प्रयत्नात खंडित वीजपुरवठाही खोडा घालतो आहे. पावसाच्या ओढीमुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे नुकसान होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकरी आपल्या कपाशीला उपलब्ध थोड्या बहुत ओलाव्याचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी हलकी वखरणी आणि निंदणी घेत आहेत. पावसाच्या खंडात पिकाला तग धरण्यास मदत होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. असे जाणवताहेत परिणाम

  • ओल तुटल्याने सोयाबीन पडतेय पिवळे
  • कपाशीची वाढ खुंटली; पातेगळ, फूलगळ वाढली
  • मका दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने धोका वाढला
  • भुईमुगाच्या आऱ्याही जमिनीत घुसलेल्या नाहीत
  • दमदार पावसाअभावी विहिरी कोरड्या
  • काही भागात उडीद, मुगाला उत्पादनात मोठा फटका
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com