यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन, कपाशीला फटका

संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत, तर कापसाची बोंडे सडत असल्याने एकरी काही किलोची उत्पादकता देखील होणार नसल्याचे चित्र आहे.
Soybean, cotton hit in Yavatmal district
Soybean, cotton hit in Yavatmal district

आर्णी, जि. यवतमाळ : संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत, तर कापसाची बोंडे सडत असल्याने एकरी काही किलोची उत्पादकता देखील होणार नसल्याचे चित्र आहे. या प्रकाराची शासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील एकाही लोकप्रनिधींकडून शिवारातील या भयावह परिस्थितीची दखल न घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नेत्यांप्रती असंतोष व्यक्‍त होत आहे. 

सिंचन सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांची सारी भिस्त पावसाच्या पाण्यावर राहते. त्यामुळे दर वर्षीच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. गेल्या वर्षीच्या हंगामात पावसामुळे सोयाबीन हातचे गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. या वर्षी देखील पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शिवारातील सोयाबीन सडले आहे.

परिणामी, उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होणार नाही, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात सुमारे पावणे पाच लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. गेल्या वर्षीच्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक काढून टाकावे लागले होते. या वर्षी सुरुवातीला गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यानंतर आता बहुतांश भागात बोंडसडीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. सध्या कापसाची बोंडे फुटण्यास सुरुवात झाली अन् पाऊस सुरू झाला. परिणामी, पीक हातचे गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आर्णी तालुक्‍यासह जिल्ह्यात सर्वदूर अशीच भयावह स्थिती असून, त्याची दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटले आहेत. शासनाने मदतीसाठी पुढाकार घ्यावा.  - राजू इंगोले, सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोणी, ता. आर्णी 

मी अडीच एकरावर कपाशीची लागवड केली होती. गेल्या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. या वर्षी चांगला उत्पन्नाचा अंदाज असताना पुन्हा नुकसान झाले आहे. - संतोष खारोळ, कापूस उत्पादक, लोणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com