सोयाबीन, कापूस प्रश्‍नांवर सरकारकडून बैठकीचे निमंत्रण

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन शनिवारी (ता.२०) मागे घेण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग करीत असलेले संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना केंद्र व राज्य शासनाकडूनहीप्रतिसाद देण्यात आला.
On soybean, cotton questions Meeting invitation from the government
On soybean, cotton questions Meeting invitation from the government

बुलडाणा ः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन शनिवारी (ता.२०) मागे घेण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग करीत असलेले संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना केंद्र व राज्य शासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सकाळी भेट घेत राज्य शासनाने आयोजित केलेल्या बैठकीची माहिती दिली. आंदोलनाचे हे यश मानले जात आहे.

सोयाबीन व कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारपासून (ता. १७) आंदोलन छेडले होते. तुपकरांनी नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले, तर कार्यकर्ते विदर्भ-मराठवाड्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी नागपुरातील आंदोलन मोडून काढत तुपकरांना बुलडाण्यात पोहोचविले. त्यांनी बुलडाण्यात घरासमोरच अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने धग वाढत गेली. शुक्रवारी (ता. १९) आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्याने बुलडाण्यात अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक झाली. रात्री उशीरा तहसीलदारांची गाडीसुद्धा पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलनांमुळे प्रशासन, शासनावर दबाव वाढत होता. अखेरीस सकाळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी शिष्टाई केली. वरिष्ठस्तरावर चर्चा करीत बुधवारी (ता. २४) या मागण्यांबाबत मुंबईत बैठक ठेवल्याचे लेखी पत्रच त्यांनी तुपकरांना सोपवले. राज्य, केंद्र सरकारकडून दखल उपमुख्यमंत्री पवार यांनी तुपकर यांच्या मागण्या समजून घेतल्या. मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. बुधवारी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आयोजित बैठकीला तुपकर व राजू शेट्टींना आमंत्रित केले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही राजू शेट्टींना  सोयाबीन पेंड आयात करणार नसल्याचे आश्‍वासन दिले आहे. लवकरच या संदर्भातील आदेश काढू. केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांच्याशी सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी कमी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

शरद पवार यांनीही केली चर्चा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा करुन केंद्रीय स्तरावर मागण्यांबाबत बैठक घडवून आणण्याचे आश्‍वासन दिले आहे. या सर्व घडामोडी शेतकरी एकजुटीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया तुपकर यांनी व्यक्त केली आहे. डॉ. शिंगणे यांच्या हस्ते तुकपर यांनी ज्यूस घेत अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. प्रकृती बिघडल्याने सध्या त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

फडणवीसांचाही पुढाकार राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते देवेंद्र फडवणीस यांनीही तुपकरांसोबत फोनद्वारे चर्चा करून केंद्रीय मंत्र्याकडे आपण स्वत: पाठपुरावा करू आणि बैठकीसाठी तुम्हाला दिल्ली घेऊन जाऊ, सदर आंदोलन थांबवा, असे सांगितले. दरम्यान, बच्चू कडू, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर, माजी मंत्री महादेवराव जानकर यांनीही फोनद्वारे तुपकरांशी संपर्क साधून चर्चा केली.

आंदोलकांवर गुन्हे दाखल शुक्रवारी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अन्नत्याग आंदोलन चिघळले. दरम्यान, शेख रफीक यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होऊन ‘रास्ता रोको’ आणि तोडफोड झाल्याने पोलिसांनी रविकांत तुपकर, ॲड. शर्वरी तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा, तसेच इतर कायद्यांनुसार गुन्हे दाखले केले आहेत. तर डॉ. शिंगणे यांनी उपोषण सोडते वेळी केलेल्या भाषणात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण स्वत: राज्याचे गृहमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com