सोयापेंड निर्यात दिलासादायक 

नोव्हेंबरमध्ये सोयापेंड निर्यात ५८ हजार टनांनी वाढून २ लाख ७० हजार टनांवर पोचली आहे. ऑक्टोबरमधील कमी निर्यातीने वाढवलेली चिंता नोव्हेंबरच्या निर्यातीने कमी केली आहे
Soybean exports are comforting
Soybean exports are comforting

पुणे : नोव्हेंबरमध्ये सोयापेंड निर्यात ५८ हजार टनांनी वाढून २ लाख ७० हजार टनांवर पोचली आहे. ऑक्टोबरमधील कमी निर्यातीने वाढवलेली चिंता नोव्हेंबरच्या निर्यातीने कमी केली आहे. त्यातच बाजारातील आवक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मागील हंगामात ३७ लाख टन होती, ती यंदा २९ लाख टनांवर आली. आवक कमी असल्याने गाळपही ८ लाख टनांनी कमी होऊन १३ लाख टनांवर आले, अशी माहिती सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशनने दिली. कमी आवक आणि गाळप तसेच वाढलेल्या निर्यातीमुळे बाजारातील दाराला आधार मिळण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.  यंदा देशातील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा ट्रेंडच बदलला आहे. एरवी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात बाजारात ३७ ते ४० लाख टन सोयाबीनची आवक होत असते. मात्र यंदा दोन्ही महिन्यांत केवळ २९ लाख टन सोयाबीन आवक झाली आहे. शेतकरी टप्प्याटप्याने सोयाबीनची विक्री करताना दिसत आहेत. ऑक्टोबरप्रमाणे गेल्या महिन्यात देखील सोयाबीनच्या आवकेत घट कायम राहिली. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन अर्था सोपाच्या मते, ऑक्टोबर महिन्यात बाजारात सोयाबीनची आवक १५ लाख टनांवर झाली होती, गेल्या वर्षी याच काळात १८ लाख टन बाजारात आवक होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीन आवक वाढण्याची आशा होती, मात्र नोव्हेंबर महिन्यात केवळ १४ लाख टन सोयाबीन बाजारात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १९ लाख टन सोयाबीन बाजारात दाखल झाले होते. म्हणजेच यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या दोन्ही महिन्यांत २९ लाख टन सोयाबीन आवक झाली,मात्र मागील हंगामात ३७ लाख टन आवक झाली होती.  सोपाच्या मते देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन ११८.८९ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील हंगामातील शिल्लक साठा आणि आयातीसह एकूण सोयाबीन पुरवठा १२४.७२ लाख टनांवर होईल. त्यापैकी १२ लाख टन बियाण्यासाठी जाऊन ११२.७२ लाख टन सोयाबीन गाळपासाठी उपलब्ध असेल. नोव्हेंबरपर्यंत २९ लाख टन आवक झाल्यानंतर त्यापैकी १३ लाख टनांचे गाळप पूर्ण झाले. यापैकी ऑक्टोबरमध्ये ६ लाख टन आणि नोव्हेंबरमध्ये ७ लाख टन सोयाबीनवर प्रक्रिया केली. गेल्या वर्षीचा विचार करता ऑक्टोबरमध्ये ९.५० लाख टन आणि नोव्हेंबर महिन्यात ११.५० लाख टन सोयाबीनचे गाळप पूर्ण झाले होते, असे सोपाने म्हटले आहे.  सोयापेंड निर्मिती पोचणार  ७१.८३ लाख टनांवर  देशात यंदा ९० लाख टन सोयाबीन गाळप होऊन त्यापासून ७१.८३ लाख टन सोयापेंड निर्मिती होईल, असे सोपाने म्हटले आहे. तर आयात ४ लाख टन आणि मागील हंगामातील शिल्लक साठा २.४१ लाख टन गृहीत धरून सोयापेंडचा एकूण पुरवठा ७८.२४ लाख टनांचा पुरवठा होईल. त्यापैकी पोल्ट्रीसह पशुखाद्यासाठी ५८ लाख टन सोयापेंड वापरली जाईल. तर मानवी आहारात ८ लाख टन आणि निर्यात १० लाख टन होईल. तसेच २.२४ लाख टनांचा पुढील हंगामासाठी शिल्लक साठा राहण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देशात १०.३८ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली आहे. गेल्या हंगामात याच काळात १६.७६ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली होती. म्हणजेच यंदा ६ लाख ३८ हजार टनाने सोयापेंड निर्मिती घटली आहे.  पावनेतीन लाख टन सोयापेंड  नोव्हेंबरमध्ये निर्यात 

देशातील सोयाबीन हंगाम सुरू झल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात केवळ २१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती, तर गेल्या वर्षी याच महिन्यात १ लाख ३५ हजार टन सोयापेंड विदेशात गेली होती. देशांतर्गत सोयापेंडचे जास्त दर असल्याने निर्यात पडतळ नसल्याचे निर्यातदार आणि जाणकार सांगत होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात सोयापेंड निर्यात २ लाख ७० हजार टनांवर पोचली. गेल्यावर्षी याच महिन्यात २ लाख १२ हजार टन निर्यात झाली होती. म्हणजेच यंदाच्या नोव्हेंबरमध्ये सोयापेंड निर्यात ५८ हजार टनांनी वाढली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात २ लाख ९१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. तर गेल्या वर्षी याच काळात ३ लाख ४७ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती. यंदा केवळ ५६ हजार टनांनी सोयापेंड निर्यात माघारली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com