दरातील सुधारणांमुळे सोयाबीन ठरतेय ‘गोल्डनबिन’

soybean
soybean

नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यातच देशाअंतर्गंत प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर गेले आहे. ३७१० रुपये क्‍विंटलचा हमीभाव असलेल्या सोयाबीनचे ४१०० ते ४२०० रुपये क्‍विंटलने व्यवहार होत आहेत.  विदर्भात वाशीम जिल्हा सोयाबीनचे हब म्हणून ओळखला जातो. कापूस शेतीला सोडचिठ्ठी देत या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय गेल्या काही वर्षांपासून अवलंबिला आहे. वाशीम जिल्ह्याच्या कारंजा बाजार समितीत सद्य:स्थितीत सोयाबीनची मोठी आवक होत आहे. दररोजची सरासरी आवक ८ हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आहे. जिल्ह्यात चार प्रक्रिया उद्योजक आहेत. त्यांच्या मार्फतही बाजारातून थेट सोयाबीनची खरेदी होते. त्यामुळे दरात तेजी येत ३७२५ ते ४२१० रुपये क्‍विंटलवर दर पोचले आहेत. गेल्यावर्षी नागपूरच्या कळमणा बाजार समितीत सोयाबीनचे दर अवघे ३००० ते ३२०० रुपये होते. यावर्षी मात्र सोयाबीन दरांनी हमीभावालाही मागे टाकले आहे.  मे, जून महिन्यांत सोयाबीनचे दर पाच हजारांवर जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मध्यप्रदेशातील सोयाबीन उत्पादन पावसामुळे अर्ध्यावर आले आहे. त्या ठिकाणच्या प्रक्रिया उद्योजकांची गरजही यातून भागविली जाऊ शकत नाही. त्यासोबतच पुढील हंगामाकरिता लागणाऱ्या बियाण्याचा देखील प्रश्‍न निर्माण होणार असल्याने मध्यप्रदेशातून सोयाबीनला वाढती मागणी आहे. त्याचाही महाराष्ट्रातील दरावर परिणाम झाल्याचे जाणकार सांगतात.  कापसाचे दर तेजीत असल्याने या हंगामात कापसाचा पेरा वाढला. या कारणामुळे आधीच सोयाबीन क्षेत्र कमी झाले होते. लागवड झालेल्या क्षेत्राला पावसाचा फटका बसला आणि धामनगाव बाजारातील आवक ४ ते ५ हजार पोत्यांची आवक राहत होती आता ती अवघी २ हजार पोत्यांवर आली आहे. त्यामुळे मे, जून महिन्यांत सोयाबीनचे दर ५ हजारावर पोचतील, अशी अपेक्षा आहे. - मनीष केला, व्यापारी, धामनगाव रेल्वे, जि. अमरावती ---- पावसामुळे राज्यात सोयाबीन हंगाम प्रभावीत झाला. त्यामुळेच आमच्या आष्टा बाजार समितीची आवक हंगामात या वेळी १४ हजार पोत्यांची राहते यावर्षी ही आवक ३ ते ४ हजार पोत्यांपुरती मर्यादित झाली आहे. मध्यप्रदेशात सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांकडून ४३०० रुपयांचा दर दिला जात आहे. इतरांकडून ४२०० रुपयाने सोयाबीन खरेदी होत आहे. बियाणेकामी असलेल्या सोयाबीनचे ४३०० ते ४५०० दर आहेत. - तरुण जैन (वेदमुथा) सदस्य, सोयाबीन प्रक्रिया संघटना, आष्टा, जि. सिहोर, मध्यप्रदेश. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com