पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त 

वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही भागात आभाळात ढग वाढत चाललेले...अशा वातावरणात सावरगाव शिवारात पांडुरंग कड हे शेतकरी पीक झाकण्यासाठी एकटेच धडपड करीत होते.
washim
washim

वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही भागात आभाळात ढग वाढत चाललेले...अशा वातावरणात सावरगाव शिवारात पांडुरंग कड हे शेतकरी पीक झाकण्यासाठी एकटेच धडपड करीत होते. आभाळाकडे पाहत होते आणि कापणी केलेल्या सोयाबीनवर प्लॅस्टिक अंथरत होते...! यंदा पावसाने शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला. त्यामुळे नुसतं आभाळ आलं तरी शेतकऱ्यांना धडकी भरायची. 

सावरगाव येथील पांडुरंग कड यांनी पावणे दोन एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. यातून त्यांना किमान १५ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादनाची आशा होती. मात्र, परतीच्या पावसाने त्यांच्या या स्वप्नांचा पार चुराडा केला. पावणेदोन एकरातील काही भागात सोयाबीनची सोंगणी आठवडाभरापूर्वी केली. सोंगलेले सोयाबीन एकत्र करून गंजी लावली होती. आठवडाभर या भागात पाऊस झाल्याने सोंगलेले सोयाबीन काही ओले तर काही कोरडे होते. ते दररोज शेतात येऊन हे झाकलेले सोयाबीन उघडे करतात व आभाळात ढग दाटले की धावपळ करीत ते झाकायला लागतात. असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. 

पांडुरंग बरडे म्हणाले, की यंदा सोयाबीनवर कीड, रोगांसाठी पाचवेळा फवारणी केली. महागडी कीटकनाशके व दोन वेळा तणनाशके फवारल्याने हाच खर्च दहा हजारांवर लागला. खत, मशागतीसाठी एवढाच खर्च झाला. या दोन्ही खर्चाची जुळवाजुळव केली तर ही रक्कम २० हजारांवर पोचते. आता किती क्विंटल सोयाबीन होईल, हे सांगता येत नाही. काही जणांना तर एकरी अवघे दोन-तीन क्विंटल सोयाबीन झाले. माझ्या शेतात उभ्या असलेल्या पिकातील शेंगांमधील दाणे अति पावसाने खराब झाले. त्यातून खर्च भागला तरी नशीब समजेल 

पीकविमा काढलेला आहे का? असे विचारले असता ‘‘तेव्हा पैशांची जुळवाजुळव शक्य न झाल्याने पीक विमा काढता आला नाही. आता या नुकसानीची काय मदत मिळेल, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कड यांचे हे प्रातिनिधीक चित्र असले तरी अशी किंवा याहीपेक्षा वाईट स्थिती अनेकांची झालेली आहे. काहींना तर सोयाबीन सोंगणीचीसुद्धा गरज भासली नाही, इतके नुकसान झाले. 

वाशीम जिल्ह्यात खरिपात सोयाबीन हेच एकमेव प्रमुख पीक. त्यानंतर तुरीची लागवड होते. इतर पिकांचे क्षेत्र दुय्यम आहे. यंदा वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड आणि वाशीम तालुक्यातील काही भागात अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान केले. प्रशासनाने या नुकसानीचा सर्वे करण्याचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत केलेल्या सर्व्हेत साधारणतः २५०० हेक्टरचे नुकसान दाखविण्यात आले. संपूर्ण अहवाल अद्याप तयार व्हायचा आहे. 

सोयाबीनच्या एकरी उत्पादन, खर्चाचे गणित  खर्च  फवारणीः ३०००  बियाणेः २५००  नांगरणीः १५००  खतेः १५००  पेरणीः ८००  इतरः ४७००  एकूणः १४०००  उत्पन्न  उत्पादनः ३ ते ४ क्विंटल  मिळणारा दरः ३५०० रुपये  एकूण उत्पन्नः १४०००  नफाः शून्य   

चार हजार हेक्टरचे ऑक्टोबरमध्ये नुकसान  एक ते २२ ऑक्टोबर या काळात झालेल्या पावसाने सुमारे ४१०५ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. जवळपास दोन कोटी ७९ लाख १४ हजारांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ऐन काढण्याच्यावेळी सोयाबीनचे बहुतांश पीक भिजले आहे. काही शेतांमध्ये काढणीअभावी उभे दिसून आले. ज्यांनी कापणी केली अशांचे सोयाबीन मळणीअभावी शेतात झाकलेले होते. यातील काहींचे ओले झाले. मालेगाव, रिसोड, वाशीम, मंगरुळपीर, मानोरा तालुक्यात नुकसान झाले आहे. 

प्रतिक्रीया  परिस्थितीमुळे पीक विमा काढता आला नाही. आता सोयाबीनचे उत्पादन एकरात किती होईल माहिती नाही. लावलेला खर्च निघेल की नाही, याची शाश्‍वती नाही. कापणी केलेले अर्धे सोयाबीन ओले झाल्याने त्यावर बुरशीसारखे दिसते आहे.  -पांडुरंग कड, सावरगाव ता. जि. वाशीम 

पीक नुकसानीच्या पाहणीसाठी अर्ज केल्यानंतर तहसिलदारांनी भेट दिली. माझ्या शेतात एका गुंठ्यात उत्पादकता काढण्यासाठी प्लॉट टाकण्यात आला. त्यात २ किलो ३०० ग्रॅम सोयाबीन आले. म्हणजेच एकरी ९८ किलो उत्पादन होते. यंदा माझी १८ एकरात लागवड होती. त्यात एकरी दोन क्विंटलपर्यंत उतारा आला. आमच्याकडे बंदीच्या भागात शेतकऱ्यांनी तर सोयाबीन सोंगले सुद्धा नाही. त्यावर सरळ ट्रॅक्टर फिरवला.  - देविदास नागरे, कुऱ्हा, ता. रिसोड जि. वाशीम   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com