सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावी

भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला भिडल्याने विदेशातून सोया पेंड आयात शुल्क लागू न करता आयात करावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने केली आहे.
Soybean meal should be imported duty free
Soybean meal should be imported duty free

नागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला भिडल्याने विदेशातून सोया पेंड आयात शुल्क लागू न करता आयात करावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने केली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पशुसंवर्धन व दुग्ध विभागाला हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांनी शिफारशीसह वाणिज्य मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविल्याने लवकरच देशात सोया पेंडची आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पोल्ट्री खाद्यामध्ये २२ टक्के सोया पेंडचा समावेश केला जातो. एका टनामागे २२० किलो सोया पेंड वापरली जाते. मात्र गेल्या हंगामात सोयाबीनची अपेक्षित उत्पादकता मिळाली नाही. त्यासोबतच संततधार पावसामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढून सोयाबीनची प्रत देखील खालावली. स्थानिक गरज पूर्ण होत नसल्याने सोयाबीनची प्रक्रिया उद्योगातून मागणी वाढली. त्याच्या परिणामी सोयाबीनचे दर सात हजारांच्या पुढे गेले. त्यामुळे सोयाबीन पेंडही महागली. पूर्वी ३५ रुपये किलो असलेली सोया पेंड दुपटीने वाढत ७० रुपये किलो झाल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली.

पोल्ट्री व्यवसायिकांना यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता विदेशातून सोया पेंड आयात करावी, अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने केली आहे. भारताच्या तुलनेत ब्राझील आणि अमेरिकेतील सोया पेंडच्या दरात प्रति टन १५ हजार रुपयांची तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सोया पेंडची १२ लाख टन आयात करावी, अशी पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आहे. पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाला या संदर्भाने प्रस्ताव सादर करण्यात आला. व्यावसायिकांची ही मागणी रास्त असल्याचे लक्षात आल्याने संबंधित विभागाने याला मान्यता देत शिफारशींसह हा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाकडे पाठविला आहे. वाणिज्य मंत्रालयात देखील याला मंजुरी मिळण्याची शक्यता असून, लवकरच आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वायद्यांवर नियंत्रण आणा वायदे बाजारात सोयाबीन व्यापारावर नियंत्रणाची मागणीदेखील पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाने वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणे दर नियंत्रणात राहतील, अशी अपेक्षा संबंधित विभागाने वर्तविली आहे. या हंगामात सोयाबीन बियाणे दर नियंत्रण न झाल्यास दर गगनाला भिडतील, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com