यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले कोंब

खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व अवस्थेतील सोयाबीन शेंगांना चक्क कोंब फुटल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत असून याची दखल घेत सर्वेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Soybean pods sprouted in Yavatmal district
Soybean pods sprouted in Yavatmal district

यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व अवस्थेतील सोयाबीन शेंगांना चक्क कोंब फुटल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत असून याची दखल घेत सर्वेक्षण करुन भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात खरिपाचे सुमारे नऊ लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी पावणे पाच ते पाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होते. उर्वरित सरासरी चार लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली राहते. त्यामुळेच जिल्ह्याचे दुसरे मुख्य पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. त्याच्या परिणामी जिल्ह्याच्या सोळा तालुक्यात उगवणविषयक समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यानंतरही दुबार- तिबार पेरणी करून शेतकऱ्यांनी पीक वाढविले.

दरम्यान पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतानाच त्यावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात चक्रीभुंग्याने देखील पीक पोखरल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभाग व तत्सम यंत्रणांकडे केल्या. त्यावर मलमपट्टी म्हणून कृषी विभागाकडून पुसद, महागाव तालुक्यातील शिवारांना भेटी देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. उपाययोजना संदर्भाने मार्गदर्शनही करण्यात आले. परंतु किडीने नुकसान पातळी ओलांडल्याने त्याचा अपेक्षित फायदा होऊ शकला नाही.

जिल्ह्यात कीड-रोगामुळे सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या संदर्भाने सर्वेक्षण व पंचनामे होत भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवर आता पुन्हा नव्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण कायम आहे. परिणामी परिपक्व होण्याच्या अवस्थेतील सोयाबीनला सूर्यप्रकाश मिळू शकला नाही. त्यामुळे शेंगांतील दाण्यांना अक्षरशः कोंब फुटले आहेत. महागाव तालुक्यातील वाकद इजारा येथील विनोद राठोड यांचे दहा एकरावर सोयाबीन आहे. तर बोरी इजारा येथील सुनील बळीराम राठोड यांच्या चार एकर क्षेत्रावरील सोयाबीनमधील दाण्यांना कोंब फुटण्याचा प्रकार समोर आला आहे. शिवारात अशा प्रकारची समस्या पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे या दोन्ही शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

खोडकीड चक्रीभुंगा आणि आता परिपक्व आणि काढण्याचे अवस्थेतील सोयाबीन शेंगाच्या दाण्यांना कोंब फुटत आहेत. नैसर्गिक आपत्तीने अशाप्रकारे सोयाबीन उत्पादकांचा पिच्छा पुरवला असला तरी शासनाने मात्र याची कोणत्याच स्तरावर दखल घेतली नाही हे दुर्दैवी आहे. - मनीष जाधव, शेतकरी, वाकद, ता. महागाव, जि. यवतमाळ

सोयाबीनवर सुरुवातीला खोडमाशीचा प्रादुर्भाव होता. ही कीड नियंत्रणात आहे. काही प्रमाणात दाणे भरण्याची अडचण म्हणजे दाण्याचे वजन या किडीच्या प्रादुर्भावामुळे घटू शकते. परिणामी यामुळे होणारे नुकसान कमी आहे असे म्हणता येईल. वीसपैकी ६-७ झाडांवर याचा प्रभाव होता. चक्रीभुंग्यामुळे होणारे नुकसान मात्र अधिक आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये पानाचा करपा याचा प्रादुर्भाव दिसून आला होता. तंत्रशुद्ध व्यवस्थापन नसणे आणि युरियाचा अधिक वापर कीड रोगांच्या प्रसाराला पूरक ठरला आहे. आता जिल्ह्याच्या काही भागात सोयाबीन शेंगांना कोंब फुटण्याचे प्रकार समोर आले आहेत. पावसाची संततधार तसेच ढगाळ वातावरणामुळे जमिनीत ओलावा कायम राहिला. त्यामुळे झाड हिरवे राहात हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. - डॉ. प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, यवतमाळ कृषी विज्ञान केंद्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com