सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या शेवटीही कायम 

चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात झालेली सुधारणा शनिवारीही कायम होती. बाजार समित्यांत शनिवारी १०० ते ३०० रुपयांपर्यंत दरात सुधारणा झाली होती.
Soybean price improvement Lasts even on weekends
Soybean price improvement Lasts even on weekends

पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात झालेली सुधारणा शनिवारीही कायम होती. बाजार समित्यांत शनिवारी १०० ते ३०० रुपयांपर्यंत दरात सुधारणा झाली होती. अनेक बाजार समित्यांत सर्वसाधारण दर ६ हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी पोल्ट्री उद्योगाची ५.५ लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी पुढे रेटल्याने शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे जाणकारांनी सांगितले.  सोयाबीन दरात सलग चौथ्या दिवशी सुधारणा झाली आहे. वायद्यांसह हजर बाजार आणि बाजार समित्यांतही सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. पुरुषोत्तम रूपाला यांनी विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहिल्याचे वृत्त बाजारात पसरल्यानंतर सोमवारी (ता. २९) सोयाबीन दरात घसरण झाली. सोयाबीन दरात घसरण होण्याची स्थिती बुधवारी दुपारपर्यंत सुरू होती. सर्वंच बाजारात दर घसरण झाल्याने सोयाबीनची पुढील वाटचाल कशी राहील, या बाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र बाजारात दर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, बाजारात पॅनिक स्थिती निर्माण होऊन शेतकरी जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आणतील, अशी आशा होती. मात्र बाजारात दर कमी झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी घाबरून विक्री केली नाही. त्यामुळे बुधवारी दुपारपासून कमी जात जाणारे दर स्थिरावले आणि काहीसे वाढीसह बाजार बंद झाले. गुरुवारी बाजार सुधारणेसह सुरू झाला. त्यानंतर शनिवारपर्यंत बाजार समित्यांत दरात सुधारणा झाली. तर वायद्यांत हजर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारीही सुधारणा झाली.  शनिवारच्या सुट्टीच्या आधी शुक्रवारी वायदे आणि हजर बाजारात सुधारणा झाली होती. जानेवारीच्या वायद्यात ३५० रुपयांची सुधारणा होऊन सौदे ६ हजार ३९३ रुपयांवर बंद झाले. तर हजर बाजारातही दरात २०० रुपयांची सुधारणा होऊन दर सरासरी ६ हजार ५५० रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी वायदे आणि हजर बाजारातील दर वाढीसह बंद झाले. त्याची प्रतिक्रिया शनिवारी वायदे आणि हजर बाजारातील सौदे बंद असले तरी बाजार समित्यांमध्ये सकारात्मक उमटली. बाजार समित्यांत दुपारी ४ वाजेपर्यंत दरात सुधारेणाच ट्रेंड होता. वाशीम बाजार समितीत सोयाबीनचा सर्वसाधारण दर शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी सुधारून ६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. किमान दर ५ हजार ५०० रुपये तर कमाल दर ७ हजार १०० रुपये मिळाला. परभणी बाजार समितीत सर्वसाधारण दर ६ हजार २५० रुपयांवर स्थिर होता. मेहकर बाजार समितीत सोयाबीनला शनिवारी ६ हजार ५०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. दरात ३०० रुपयांची सुधारणा झाली होती.  सरकारच्या निर्णयाकडे  लक्ष देऊन विक्री करावी 

दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा दराने उभारी घेतली असली तरी काही मुद्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सोयापेंड आयातीसाठी खुद्द केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री यांनीही पोल्ट्री उद्योगाची मागणी पुढे रेटली आहे. त्यांच्या मागणीला सर्वच स्थरांतून विरोध झाला असला तरी सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यास दरावर परिणाम होऊ शकतो. त्यातच देशातून सोयापेंड निर्यात थांबली आहे. कारण सोयापेंड निर्यात पडतळ नसल्याने निर्यात होत नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. जागतिक बाजारात भारतीय सोयापेंड महाग पडत आहे. त्यातच सरकारने आयातीचा निर्णय घेतल्यास दरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने सोयाबीन विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com