सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता

सांगलीः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढण्याचे नियोजन करु लागले आहेत.
Soybean production likely to decline in Sangli district
Soybean production likely to decline in Sangli district

सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन काढण्याचे नियोजन करु लागले आहेत. पलूस, वाळवा, कडेगाव तालुक्यातील शेतकरी सोयाबीन काढून मळणीची तयारी करीत आहेत. सततच्या पावसाने सोयाबीनच्या एकरी उत्पादनात १५ ते २०  टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सुमारे ४५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. गतवर्षीपेक्षा चालुवर्षी सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात ३ ते ४ हजार हेक्टरने घट झाली होती. मुळात पलूस तालुक्यात सोयाबीनची आगाप पेरणी केली जाते. यंदाच्या हंगामात पावसाला उशीरा सुरवात झाली होती. त्यामुळे सोयाबीन पेरणीस विलंब झाला. त्यानंतर अधून मधून पाऊस पडत होता. हा पाऊस पिकास उपयुक्त ठरत असल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 

दरम्यान, पावसाचा खंड आणि अधून मधून पडणारा हलका पाऊस यामुळे सोयाबीनवर पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकरी धास्तावला होता. पिकास पोषक वातावरण असल्याने सोयाबीन चांगले बहरले होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाला सुरवात झाली. त्यामुळे काढणी आलेले सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी पीक काढून मळणी करण्यास सुरवात केली होती. परंतु, सातत्याने सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी थांबवली होती. सध्या शेतकरी सोयाबीन काढणीसाठीचे नियोजन करु लागले  आहेत. 

काढणीचा दर वाढला

जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीन काढणीसाठी एकरी ३००० रुपये असा दर होता. यंदा एकाच वेळी सोयाबीनची काढणी आल्याने शेतकरी मजूरांची शोधा शोध करु लागला आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीच्या दरात एकरी ५०० रुपयांची वाढ झाली असून एकरी ३५०० रुपये असा दर आहे. 

उत्पादनात घट होण्याची शक्यता

पाऊस थांबून पाच दिवस झाले. अजूनही सखल भागातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यातच काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादनात १५ ते २० टक्के घट होण्याचा अंदाज आहे.

पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनची काढणी सुरु केली आहे. परंतू या पावसाने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.  - तात्यासो नागावे, खटाव, ता. पलूस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com