तेजीमुळे सोयाबीन बियाण्यांची टंचाई शक्य 

सोयाबीन दरात आलेली प्रचंड तेजी पाहून बियाणे विक्रीतील छोट्या कंपन्या खुल्या धान्य बाजारात माल विकण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास राज्यात बियाण्यांची टंचाई तयार होऊ शकते, असा अंदाज बियाणे उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
Soybean seed scarcity possible due to rate hike
Soybean seed scarcity possible due to rate hike

पुणे : सोयाबीन दरात आलेली प्रचंड तेजी पाहून बियाणे विक्रीतील छोट्या कंपन्या खुल्या धान्य बाजारात माल विकण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास राज्यात बियाण्यांची टंचाई तयार होऊ शकते, असा अंदाज बियाणे उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. 

“अनेक छोटे बियाणे विक्री व्यवसायिक आमच्या माहितीनुसार त्यांच्या ताब्यातील माल बियाणे म्हणून विकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. कारण धान्य बाजारात सोयाबीनला प्रतिकिलो ७०-७५ रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. बियाणे व्यवसायिकांनी ४०-५० रुपये दराने सौदे केलेले आहेत. त्यामुळे खुल्या बाजारात माल विकला तरी नफा ठरलेला आहे,” अशी माहिती एका बियाणे कंपनीच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

“खुल्या बाजारात जादा दर मिळत असल्याने यंदा परराज्यांतील बियाणे कमी प्रमाणात राज्यात येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील दुय्यम दर्जाच्या बियाण्यांची घुसखोरी रोखण्याची आम्ही सातत्याने मागणी करीत होतो. त्याबाबत कृषी विभागाने यापूर्वीच्या उपाययोजना उपयुक्त ठरतील,” असे उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट सीड्‌स फेडरेशन (ओडीएसएफ) व्यवस्थापकीय संचालक अॅड. अमोल रणदिवे यांनी सांगितले. 

कारवाईची टांगती तलवार  अनेक अडचणींतून सध्या ताब्यात येणारा माल हा पुढे बॅगिंग करून बियाणे म्हणून विकण्याचा प्रयत्न केल्यास जास्त नफा मिळू शकतो. मात्र कृषी विभागाच्या अनेक अटींना तोंड द्यावे लागेल. तसेच गेल्या वर्षीप्रमाणेच फौजदारी गुन्ह्याला देखील सामोरे जावे लागण्याची टांगती तलवार असल्याने छोट्या युनिटचालकांना खुल्या बाजारात माल विकण्याचा पर्याय जवळचा वाटतो आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

“राज्याच्या सोयाबीन बियाणे बाजारपेठांमध्ये ५०-६० टक्के सुटा माल मध्य प्रदेशातून येतील. हा माल यंदा राज्यात कमी येण्याची दाट शक्यता आहे. कारण सोयाबीनचे दर चढे असल्याने मध्य प्रदेशातील युनिटतेथील बियाणे युनिटकडून बियाण्याचा दर्जा राज्यातील कंपन्यांच्या तुलनेत दुय्यम असतो. मात्र हा माल राज्याच्या मालाशी स्पर्धा करतो. त्यामुळे स्थानिक कंपन्यांचे आणि शेतकऱ्यांचेही नुकसान होते. त्यामुळे हा माल राज्यात येणार नसल्यास चांगलेच आहे,” असेही एका स्थानिक बियाणे उत्पादक कंपनीचे म्हणणे आहे. 

टंचाई अशक्य ः कृषी खाते  कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी मात्र बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही, असा दावा केला आहे. “सोयाबीनमधील सर्व वाण सरळ वाण गटातील आहेत. अशा वाणांच्या उत्पादनापासून पुढील दोन-तीन वर्षे तेच बियाणे पुन्हा वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा घरचे बियाणे वापरण्यासाठी व्यापक अभियान राबविले गेले आहे. त्यामुळे यंदा ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके, वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी गट व कंपन्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनचा वापर बियाणे म्हणून यंदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे टंचाईची शक्यता वाटत नाही,” असे एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com