राज्यात सोयाबीन २३५० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल

राज्यात सोयाबीन २३५० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल
राज्यात सोयाबीन २३५० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल

नांदेड, परभणीत ३१५० ते ३४५० रुपयांचा दर

नांदेड : ‘‘नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. ९) सोयाबीनची ३०३ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ३१५० ते ३४५० रुपये दर मिळाले,’’ अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. ३) सोयाबीनची १६६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३५५१ ते ३७११ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ४) ३४९ क्विंटल आवक झाली. या वेळी प्रतिक्विंटलला ३३०१ ते ३६११ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ५) ३९८ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला ३३०० ते ३६०० रुपये दर मिळाले. 

सोमवारी (ता. ७) ३२९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३१०० ते ३५६१ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ९) ३०३ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला ३१५० ते ३४५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १०) सोयाबीनची सुमारे ९५० क्विंटल आवक झाली.परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३) सोयाबीनची २४ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ३८०१ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ४) १९ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ३१५० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ५) २९ क्विंटल आवक राहिली. त्या वेळी प्रतिक्विंटलला ३९२५ रुपये दर मिळाले. 

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ७) २३८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३२०० ते ३६०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ९) २४२ क्विंटल आवक असताना ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

जालन्यात २३५० ते ३९०० रुपये, विदर्भातूनही आवक

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३० सप्टेंबर ते ९ ऑक्‍टोबर या दरम्यान सोयाबीनला २३५० ते ३९०० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंतचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

जालना बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनची जवळपास २० सप्टेंबरपासून आवक सुरू झाली आहे. जालनासह औरंगाबाद, परभणी, बीड व विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातून ही आवक होते आहे. अलीकडच्या चार ते पाच दिवसांत पावसाच्या हजेरीने आवक थोडी मंदावली होती. आता पुन्हा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेबरला २८८ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ३००० ते ३९०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. १ ऑक्‍टोबरला ४७७ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर २९९१ ते ३९०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

तीन ऑक्‍टोबरला १७४० क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर २९७५ ते ३८७५ रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ ऑक्‍टोबरला १४७९ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी सोयाबीनला २५०० ते ३७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ ऑक्‍टोबरला आवक ४५१४ क्‍विंटल, तर दर २५५० ते ३६७५ रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ ऑक्‍टोबरला ३३७५ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनला २३५० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

लासलगावात ३१८० ते ३७२० रुपये

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ९) सोयाबीनची २३० आवक क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३१८० ते ३७२० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६६४ रुपये असे होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सोमवारी (ता. ७) सोयाबीनची आवक २९९ क्विंटल झाली. तिला २४०१ ते ३७८१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७१५ मिळाला. 

शुक्रवारी (ता. ४) सोयाबीनची आवक ४७९ क्विंटल झाली. त्याला २००० ते ३७०५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६८१ मिळाला.

गुरुवारी (ता. ३) सोयाबीनची आवक ३७० क्विंटल झाली. त्या वेळी ३००१ ते ३८०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७३० रुपये होता.

 मागील आठवड्यापासून बाजार समितीत सोयाबीनची आवक चांगली होती. चालू आठवड्यात आवक मंदावली असून त्यानुसार दर सर्वसाधारण आहेत. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे बाजारभावतही चढ उतार दिसून आला. शनिवारी (ता. ५) व रविवारी (ता. ६) बाजार समितीचे कामकाज बंद होते. तर मंगळवारी (ता. ८) दसरा सणामुळे बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने सोयाबीनचे व्यवहार झाले नाहीत.

अमरावतीत कमाल ३४१० रुपये

विदर्भातील बाजार समित्यांमध्ये या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. अमरावती बाजार समितीत नव्या सोयाबीनचे व्यवहार २७०० ते ३४१० रुपये क्‍विंटलने होत आहेत. 

वाशीम जिल्हयातील कारंजा बाजार समितीत नव्या सोयाबीनची विक्रमी साडेपाच हजार क्‍विंटलची आवक नोंदविण्यात आली आहे. कारंजा बाजार समितीत नव्या सोयाबीनला २९५० ते ३३५० रुपये क्‍विंटलचे दर मिळाले. या हंगागातील सोयाबीनची आवक सुरू झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. जुन्या सोयाबीनचे व्यवहार अमरावती बाजार समितीत ३२५० ते ३६८० रुपये क्‍विंटलने होत आहेत. 

वाशीम जिल्ह्यात सोयाबीनखालील सर्वाधीक क्षेत्र आहे. त्यामुळे या भागातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक सर्वाधिक राहते. त्यानुसार कारंजा बाजार समितीत विक्रमी साडेपाच हजार क्‍विंटलची आवक नोंदविली गेली. शासकीय खरेदीनंतरच सोयाबीनच्या दरात काही अंशी सुधारणा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अकोल्यात २९०० ते ३३५० रुपये

अकोला येथील बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. १०) त्याला २९०० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. बाजारात ४३८ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते.  गेल्या हंगामातील सोयाबीन मात्र, ३६५० रुपये प्रतिक्‍विंटल दराने विक्री झाले.

बाजार समितीमध्ये नवीन आणि जुने असे दोन्ही प्रकारचे सोयाबीन सध्या विक्रीसाठी येत आहे. या हंगामात लागवड झालेल्या सोयाबीनची काढणी सध्या जोराने सुरू आहे. आगामी दिवाळीपर्यंत यामुळे बाजार समितीत हजारो क्विंटल आवक होण्याची चिन्हे आहेत. या वर्षी वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची सर्वाधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे.

मध्यंतरी संततधार पाऊस झाल्याने सोयाबीन हंगाम थोडासा लांबणीवर पडला. आता पावसाने उघाड घेताच सोयाबीनची कापणी आणि मळणी अधिक जोमाने सुरु झाली. गुरुवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन २९०० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाले. या सोयाबीनची आवक  पुढील आठवड्यापासून अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. अशावेळी बाजार समितीतील दर किती राहतील, याबाबत सध्याच माहिती सांगणे कठीण असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. गेल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचे दर  ३८५० पर्यंत पोचले होते. आता त्यात उतार झाला आहे.

जळगावात २८०० ते ३७०० रुपये दर

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक याच आठवड्यात सुरू झाली आहे. सततच्या पावसाने मळणीमध्ये व्यत्यय आला. यामुळे सोयाबीन तयार होऊन बाजारात हव्या त्या प्रमाणात अजूनही येत नसल्याची स्थिती आहे. 

सोयाबीनचा दर्जा चांगला आहे. परंतु, अधिक आर्द्रता असल्याने दरांबाबत हवी तशी सकारात्मक स्थिती नाही. गुरुवारी (ता. १०) बाजारात ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. दर प्रतिक्विंटल २८०० ते ३७०० रुपये असा होता. मागील गुरुवारी (ता. ३) कुठलीही आवक बाजारात झालेली नव्हती. सध्या सोयाबीनची मळणी करून त्याचा दर्जा सुधारण्यासाठी उघड्यावर तो वाळविला जात आहे. तसेच, काही शेतकरी स्वच्छतादेखील करून घेत आहेत. 

सोयाबीनचा हंगाम चोपडा, जळगाव, यावल, पाचोरा या भागांत आहे. याच भागातून आवक पुढील आठवड्यात वाढू शकते. तसेच बुलडाणा, जालना व औरंगाबाद या भागांतूनही पुढील आठवड्यात आवक वाढेल.

सोलापुरात सर्वाधिक ३५०० रुपये

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सोयाबीनला चांगला उठाव मिळाला. सोयाबीनला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात सोयाबीनची आवक रोज २०० ते ३०० क्विंटलपर्यंत होते आहे. ही आवक प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर भागांतून झाली. जिल्ह्यातील आवक तुलनेने खूपच कमी आहे. गेल्या पंधरवड्यापासून त्याच्या दरात चढ-उतार होतो आहे. पण दर स्थिर आहेत. या सप्ताहात सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ३२०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला.

या आधीच्या सप्ताहात दर किमान २८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ३६०० रुपये होता. आवक प्रतिदिन १०० ते २०० क्विंटलपर्यंत होती. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही आवक प्रतिदिन २०० ते ३०० क्विंटलपर्यंत होती. पण  दर पुन्हा जैसे थेच होते. सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ३२०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. येत्या काही दिवसांत आवक कशी होते, त्यावरच दरातील चढ-उतार समजेल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

साताऱ्यात प्रतिक्विंटल ३५५० ते ३६०० रुपये 

सातारा  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी (ता.१०) सोयाबीनला क्विंटलला ३५५० ते ३६०० असा दर मिळाला आहे. गतसप्ताहाच्या तुलेनत सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

दर वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी ठेवलेले सोयाबीन सध्या बाजारात येत आहे. पुढील एक ते दोन आठवड्यात नवीन सोयबीन बाजारात येण्याची शक्यता असल्याने त्याच्या आवेकत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.  

सध्या सोयाबीन काढणीला आले असतानाच जोरदार पाऊस सुरू असल्याने सोयाबीनचे नुकसान होणार आहे. गुरूवारी (ता.३) सोयाबीनला क्विंटलला ३७५० ते ३८२५ असा दर मिळाला होता. २६ सप्टेंबरला सोयाबीनला क्विंटलला ३८८० ते ३८२५ असा दर मिळाला होता.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com