मराठवाड्यात टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर योजनांना गती द्या ः कृषी आयुक्त

टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर योजनांना गती द्या ः कृषी आयुक्त
टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर योजनांना गती द्या ः कृषी आयुक्त

औरंगाबाद ः मराठवाड्यात कृषी विभागामार्फत राबवल्या गेलेल्या विविध योजनांची प्रगती तसेच टंचाई स्थितीत करावयाच्या उपाययोजनांचा कृषी आयुक्‍त डॉ. सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी येथे शुक्रवारी (ता. २३) गतिमान आढावा घेतला. येत्या काळात फळबागा वाचविण्यासाठी कृषी विद्यापीठासह कृषी विभागाची असलेली विशेष मोहीम लवकरच राबवली जाईल. रोहयोची कामे, कृषीअंतर्गत रोजगारनिर्मिती यासह गाळमुक्‍त धरण - गाळयुक्‍त शिवार योजनेला विशेष गती देण्याचे निर्देश डॉ. सिंह यांनी या वेळी दिले.

या वेळी औरंगाबादचे अप्पर आयुक्‍त शिवानंद टाकसाळे, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक टी. एन. जगताप, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे उपस्थित होते. या वेळी श्री. सिंह म्हणाले, की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्‍यातील स्थिती, भविष्यातील चाराटंचाईचे संकट, त्यादृष्टीने चारानिर्मितीसाठी गाळ पेरा नियोजन, विविध योजनांची उद्दिष्टपूर्ती, प्रगती, योजनांची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी, कृषी विभागाच्या माध्यमातून टंचाईच्या स्थितीत करता येणारी रोहयोची कामे, रोजगारनिर्मीती, यांत्रिकीकरण योजना, कोरडवाहू शेती विकासातंर्गत प्रगती, गाळमुक्‍त धरण - गाळयुक्‍त शिवार अभियानाला गती देणे याबाबत आढावा घेऊन त्याला गती देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

बारामती येथे झालेल्या चारही कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या बैठकीत अवर्षण स्थितीत फळबाग वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी मंथन झाले होते. त्यामध्ये अर्वषणात फळबागा वाचविण्यासाठीचे विविध उपाय सुचविले गेले. त्यापैकी मराठवाड्यात राबवता येऊ शकणाऱ्या उपायांवर कृषी विभाग व कृषी विद्यापीठ एकत्र येऊन लवकरच काम सुरू करेल. त्यानंतर या उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत कृषी यंत्रणेमार्फत पोचवल्या जातील. अप्पर आयुक्‍त आयुक्‍त श्री. टाकसाळे यांनी टंचाई परिस्‍थिती नियोजनार्थ उपाययोजनांची माहिती दिली.

किमान पाच गावांत प्रत्येकी २० शेततळी उभारा विभागातील ज्या गावात शेततळेच नाहीत अशा गावात तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जात शेततळ्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देऊन द्यावे. अशा गावांमध्ये किमान २० शेततळी उभारण्याचे निर्देश कृषी आयुक्‍तांनी दिले. शेततळ्यांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही श्री. सिंह यांनी स्पष्ट केले.

कृषी आयुक्‍त म्हणाले... मल्चिंगकरिता अनुदानासाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देणार, चारानियोजनासाठी आरकेव्हीवायअंतर्गत २५ कोटींच्या योजनेला लवकरच मंजुरी, पांडूरंग फुंडकर फळबाग योजनेंतर्गत अपेक्षित प्रगती नसल्याबद्दल नाराजी, अस्तरीकरणानंतर शेततळे अनुदानाविषयी परिस्थितीनुसार सुधारित निर्णयाची चाचपणी करणार, डिसेंबर-जानेवारीपर्यंत कृषी विभागांतर्गत रिक्‍त पदे भरणे अपेक्षित.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com