कृषी आयुक्तालयातील कामाला गती

कृषी विभाग
कृषी विभाग

पुणे  : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील कामाला वेग देण्यासाठी आयुक्तांकडून झपाट्याने बदल केले जात आहेत. स्वतः आयुक्त सुहास दिवसेदेखील ‘सेंट्रल बिल्डिंग’ सोडून काही वेळ ‘साखर संकुल’मधून काम करण्यावर भर देत आहेत.  २५ हजार मनुष्यबळ असलेल्या कृषी खात्याची सर्व प्रशासकीय सूत्रे आयुक्तालयातून हलविली जातात. आयुक्तालयातील सर्व विभागांमध्ये आयुक्तांचा कक्ष अतिमहत्त्वाचा समजला जातो. या कक्षाची सूत्रे आतापर्यंत उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे होती. मात्र, आयुक्तालयाच्या कामकाजाची खडा न् खडा माहिती असलेले तंत्र अधिकारी विनायक देशमुख यांना आता आयुक्त कक्षाचे प्रमुख करण्यात आलेले आहे. आयुक्तांच्या उपसंचालक कार्यालयाची सूत्रे त्यांच्याकडे देण्यात आलेली आहेत.  “आयुक्तांकडून घेतल्या जाणाऱ्या सुनावण्या, चौकशा, गोपनीय पत्रव्यवहार, प्रशासकीय समन्वय या सर्व बाबी आता श्री. देशमुख यांच्या कक्षेत येतील, त्यामुळे कामकाजाला वेग आला असून आयुक्त कक्षाची घडी बसल्यामुळे स्वतः आयुक्त श्री. दिवसे आता ‘सेंट्रल बिल्डिंग’ सोडून ‘साखर संकुल’मध्ये थांबण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुक्तांनी विस्तार संचालकांच्याच कार्यालयात आपले कामकाज सुरू केले आहे. आयुक्तालयात असा प्रयोग यापूर्वी झालेला नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  सेंट्रल बिल्डिंगमधील गुणनियंत्रण संचालक कार्यालयाची तात्पुरती सूत्रे सहसंचालक विजयकुमार घावटे यांना दिल्यानंतर गुणनियंत्रण कामकाजात आयुक्तांनी सुसूत्रता आणली आहे. त्यासाठी सहसंचालक दिलीप झेंडे, सहसंचालक दादासाहेब सप्रे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी केशवराव मुळे यांची मोठी मदत लाभत आहे. या इमारतीमधील दुसरे महत्त्वाचे कार्यालय मृदसंधारण संचालकांचे आहे. या कार्यालयात बहुतेक निर्णय सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असत. मात्र, आता मृदसंधारण कामकाजातील निष्णात असलेल्या दादासाहेब सप्रे यांच्याकडे दिली गेली आहेत. श्री. बोटे हे पाणलोटमधील जाणकार असून त्यांना त्यांच्या वसुंधरा पाणलोट प्रकल्पात त्यांच्या मूळ पदावर पाठविण्यात आले आहे.  साखर संकुलमध्ये आयुक्त स्वतः विस्तार संचालकांच्या कार्यालयात बसू लागल्यामुळे या पदाची तात्पुरती सूत्रे सांभाळणारे नारायणराव शिसोदे आता श्री. घावटे यांच्या मूळ कार्यालयात बसून कामकाज पाहू लागले आहेत. क्रॉपसॅप प्रकल्पाला आयुक्तांनी वेग दिला आहे, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोणतेही काम न दिलेल्या सुभाष काटकर यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपविली आहे. श्री. काटकर हे आता सहसंचालक अनिल बनसोडे यांच्या मूळ कार्यालयात बसून कामकाज पहात आहेत. श्री. बनसोडे यांच्याकडे आत्मा संचालकपदाची सूत्रे आल्यानंतर ते तत्कालीन सहसंचालक मच्छिंद्र घोलप यांच्या कार्यालयात बसून कामकाज करीत आहेत.  आयुक्तांनी फलोत्पादन विभागालादेखील चालना दिली आहे, त्यामुळे फलोत्पादन संचालकांचे मूळ कार्यालय यापुढेही रिकामेच राहण्याची चिन्हे आहेत. कारण, विद्यमान संचालक प्रल्हादराव पोकळे हे फलोत्पादन संचालक कार्यालयात न बसता प्रक्रिया संचालकांच्या सुसज्ज कार्यालयात बसून काम करीत होते, त्यामुळे फलोत्पादन संचालक कार्यालयात यापुढे मुख्य मदार  सहसंचालक शिरीष जमदडे यांच्याकडे राहणार आहे.  विस्तार सहसंचालक सुभाष खेमनर निवृत्त होताच त्यांचे रिक्त पद इतर सहसंचालकाला किंवा एसएओला न देता अभ्यासू अधिकारी म्हणून लौकिक असलेले डॉ. रामचंद्र लोकरे यांच्याकडे दिले गेले आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनांच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. या सर्व गोंधळात गुणनियंत्रण विभागात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी येण्यासाठी एसएओंमधील चढाओढ अजूनही सुरू आहे. या पदासाठी पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वजन असलेल्या एका अधिकाऱ्याची निवड जवळपास निश्चित झाली आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  आयुक्तालयात रंगली ‘झेड सिक्युरिटी’ची चर्चा कृषी आयुक्तालयात होत असलेल्या प्रशासकीय बदलावर अभ्यासू सहसंचालक दिलीप झेंडे यांची छाप असल्याची कर्मचारीवर्गात चर्चा आहे. एखादी नियुक्ती किंवा निर्णयावर श्री. झेंडे यांचा वरचष्मा असल्यास  ‘हा निर्णय झेड सिक्युरिटीने अर्थात श्री. झेंडे यांनी घेतला,’ असे कर्मचारी गमतीने बोलतात. आयुक्तालयात सध्या अनेक अधिकारी एकमेकाचे बॅचमेट, क्लासमेट असून या मैत्रीचा फायदा प्रशासकीय घडी  बसवण्यासाठी घेतला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com