राज्यातील सूतगिरण्यांना १४ लाख गाठींची गरज 

राज्यात सुमारे १५० सूतगिरण्या सुरू आहेत. या गिरण्यांना रोज ८ ते १० हजार कापूस गाठींची आवश्यकता आहे. पण गाठींचा पुरवठा बाजारातील तेजी व कमी पुरवठा यामुळे विस्कळीत होत आहे.
Spinning mills in the state need 14 lakh bales
Spinning mills in the state need 14 lakh bales

जळगाव ः  राज्यात सुमारे १५० सूतगिरण्या सुरू आहेत. या गिरण्यांना रोज ८ ते १० हजार कापूस गाठींची आवश्यकता आहे. पण गाठींचा पुरवठा बाजारातील तेजी व कमी पुरवठा यामुळे विस्कळीत होत आहे. यातच सूतगिरण्या कोविड व इतर कारणांमुळे अडचणीत असतानाच वीजबिलांमधील सवलत देखील शासनाकडून मिळत नसल्याची स्थिती आहे.  राज्यात ४३ सहकारी सूतगिरण्या सुरू आहेत. तर खासगी व इतर सुमारे १०७ सूतगिरण्या आहेत. राज्यात यंदा सूतगिरण्यांना किमान १४ लाख कापूस गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवश्यकता भासणार आहे. सुताला सर्वत्र उठाव असल्याने सूतगिरण्या ९० ते ९५ टक्के क्षमतेने कार्यरत आहेत. यंदा परदेशात मोठी सूतनिर्यात होण्याचा अंदाज आहे. पण कापूस गाठींचा विस्कळीत पुरवठा होत आहे. देशात कापसाचे जेवढे उत्पादन होईल, तेवढा वापर देखील कापूस उद्योगात होईल. पण तेजी व इतर कारणांमुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी राज्यातील सूतगिरण्यांना सूत निर्मितीसाठी रोज ८ ते १० हजार कापूस गाठींचा पुरवठा होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे तेजीचा लाभ गिरण्या उचलू शकत नसल्याची स्थिती आहे. 

वीज सवलत मिळेना  सूतगिरण्यांना प्रति युनिट तीन व दोन रुपये सूट देण्याची घोषणा राज्यात शासनाने केली होती. त्याचा आदेश, पत्रही जारी झाले होते. पण ही सवलत मिळत नसल्याने विजेसाठी अधिकचा निधी लागत आहे. सहकारी सूतगिरण्यांना प्रति युनिट तीन रुपये सवलत जाहीर झाली होती. तर खासगी (पात्र) गिरण्यांना प्रति युनिट दोन रुपये सवलत जाहीर झाली होती. या सवलतीसंबंधी मोठा निधी शासनाकडे अडकला आहे. तो मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागत आहे. 

सूत, कापड निर्यात वाढली  देशात दाक्षिणेकडील राज्यांत ४०० सूतगिरण्या कार्यरत आहेत. सुताचे दर गेल्या वर्षी १८० ते २०० रुपये प्रति किलो होते. यंदा ३०० रुपये प्रति किलोचा दर आहे. कापडाच्या दरातही मीटरमागे १५ ते २० रुपयांची दरवाढ झाली आहे. कापडासही उठाव आहे. सूत, कापड निर्यात वेगात सुरू आहे. देशातून यंदा किमान ११०० कोटी किलो सुताची निर्यात होण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक निर्यात चीन, व्हिएतनाम, बांगलादेश येथे होण्याची शक्यता आहे. पण, सूत, रुईची निर्यात वेगाने सुरू असल्याने कंटेनरचा तुटवडा जाणवत आहे. कंटेनर अभावी सौदे झाल्यानंतर ते पूर्ण करणे अडचणीचे झाले आहे. शिवाय महागाई व तुटवड्यामुळे कंटेनरचे भाडेही वधारले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

प्रतिक्रिया 

सुताची मोठी निर्यात राज्यातून सुरू आहे. चीन, व्हिएतनाममध्ये मागणी चांगली आहे. पण ही मागणी पूर्ण करताना कापूसगाठी, कंटेनरचा तुटवडा या समस्यांचा सामना करावा लागत आहे.  - दीपक पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com