नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
अॅग्रो विशेष
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा हल्ला
तागावर प्रादुर्भाव झालेल्या ‘स्पोडोप्टेरा लिट्युरा अळीच्या नियंत्रणासाठी अधिकृत शिफारसी नाहीत. मात्र या पिकावरील सेमी लूपर अळीच्या नियंत्रणासाठी अझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा क्विनॉलफॉस ३० मिली प्रति १० लिटर पाणी अशी शिफारस आहे. सध्याच्या वातावरणात नैसर्गिकरीत्या आढळत असलेल्या मित्रबुरशींमुळे स्पोडोप्टेरा अळी नियंत्रणात येऊ शकते.
- डॉ. बसवराज भेदे, सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) जोरात आक्रमण केलेले असताना ताग पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी म्हणजेच ‘स्पोडोप्टेरा लिट्युरा या अळीने हल्ला केला आहे. ही अळी तागाचे पीक खावून फस्त करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यंदा खरिपातील पिके विविध किडी-रोगांच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त आहेत.
नगर जिल्ह्याने गेल्या दोन वर्षांपासून गंभीर दुष्काळाशी सामना केलेला आहे. गेल्यावर्षी पिके पावसाअभावी वाया गेलेली होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सोसावा लागला होता. यंदाही अजून पुरेसा पाऊस नाही. मात्र अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असताना रोगाच्या प्रादुर्भावाने यंदा बहुतांश पिके संकटात आहेत.
मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले असून, पेरणी झालेले सुमारे ९५ टक्के पीक पूर्णतः वाया गेलेले असल्यामुळे यंदा मोठी हानी झालेली आहे. दुष्काळाशी सामना करताना यंदाच्या खरीप हंगामातील इतर पिकेही विविध रोगांच्या प्रादुर्भावाने नुकसान होत आहे. अकोले तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात हिरवळीच्या खतासाठी तागाची लागवड करतात.
कृषी विभागाकडे तागाच्या पेरणीचा निश्चित आकडा नसला तरी अलीकडच्या काळात हिरवळीच्या खताचा वापर वाढल्याने मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरात दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर तागाची लागवड होत आहे. मात्र यंदा तागावर स्पोडोप्टेरा लिट्युरा या अळीने हल्ला केला आहे.
नगर जिल्ह्यामध्ये बहतुांश ठिकाणी तागाचे पीक अळीने फस्त केले आहे. अनेक ठिकाणी तर तागाची पूर्णतः पाने खाल्ल्याने केवळ काड्याच शिल्लक राहिल्या आहेत. तागाचे हिरवळीचे खत हे भाजीपाला व अन्य पिकांसाठी बहुतांश प्रमाणात वापरतात. अळीच्या प्रादुर्भावाबाबत कृषी विभागाला मात्र काही सांगता येणे कठीण झाले आहे.
प्रतिक्रिया
हिरवळीच्या खतासाठी आमच्या भागात मोठ्या प्रमाणात ताग घेतात. यंदा काळपट दिसणाऱ्या अळीने (स्पोडोप्टेरा लिट्युरा) बहूतांश ठिकाणी तागाचे पीक फस्त केले आहे. आता भाजीपाल्यावरही ही अळी आक्रमण करते की काय? याबाबत भीती आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपापयोजना करण्याची गरज आहे.
- गणेश तोरकड, शेतकरी विरगाव, ता. अकोले, जि. नगर