मक्यावरील लष्करी अळीमुळे पोल्ट्री उद्योगाला फटका

मक्यावरील लष्करी अळीमुळे पोल्ट्री उद्योगाला फटका
मक्यावरील लष्करी अळीमुळे पोल्ट्री उद्योगाला फटका

नाशिक : मागील वर्षी मका उत्पादन कमी झाल्यामुळे पोल्ट्री खाद्यासाठी मक्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यात दुष्काळीस्थिती असल्याने अनेक अडचणींचा सामना पोल्ट्री व्यावसायिकांना करावा लागला. तसेच उष्णतेमुळे मरतुक व महापुरामुळे मंदावलेली वाहतूक यामुळे मोठा आर्थिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला. हे संकट सोबतीला असताना चालू वर्षी मका पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने पोल्ट्री उद्योगात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पोल्ट्री खाद्यासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल म्हणजे मका मागणीच्या तुलनेत उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे खाद्य उत्पादनाचे गणित बिघडल्याने अजूनच अडचणीत वाढ होणार असल्याची भीती पोल्ट्री व्यावसायिकांसमोर निर्माण झाली आहे. मक्याचा हमीभाव १७०० रुपये प्रतिक्विंटल असताना सध्या २४०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी सुरू आहे. त्यामुळे अतिरिक्त ४७ टक्के अधिक दराने मका खरेदी करावा लागत आहे.

लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्यामुळे खरीप हंगामात मक्याची उत्पादकता घटणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत पक्षी उत्पादनाचे गणित व बाजारभावावर मोठा परिणाम होणार असल्याचे वास्तव समोर  आहे. राज्यभरात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी उत्पादनांवर ३० टक्के परिणाम होणार असल्याची भीती आहे. त्यामुळे पोल्ट्री खाद्यासाठी होणारा मक्याचा पुरवठा संतुलित प्रमाणावर होण्यास मोठी अडचण येणार आहे. उत्पादनात घट होणार असल्याने चालू वर्षी खाद्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढतील. त्यामुळे त्यामुळे सर्व व्यावसायिक गणिते व बाजारभाव देताना अडचण होणार आहे. 

जगाच्या तुलनेत केवळ २ टक्के मका उत्पादन देशात होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात सरकार मका लागवड क्षेत्रावर उत्पादन निश्चित ठरविते. चालू वर्षी मका लागवड उशिरा झाली असून, लष्करी अळीच्या भीतीने पेरा कमी आहे. त्यामुळे चालू वर्षीचे मका उत्पादन कमी असणार आहे. सरकारने याबाबत योजना आखून वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे.

रोजगारासह अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती  ग्रामीण भागात अनेक शेतकरी कृषिपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात. प्रत्येक १००० पक्ष्यांमागे ग्रामीण भागात ६ जणांना रोजगार मिळतो. देशभरातील हा उद्योग १ कोटी २० लाख कोटींचा आहे. त्यात ८० हजार कोटींचा व्यवसाय ब्रॉयलरमध्ये; तर ४० हजार कोटींचा व्यवसाय लेअरमध्ये आहे. जर मकापुरवठासारख्या समस्या निर्माण होत राहिल्यास मोठी धोक्याची घंटा कृषिपूरक व्यवसायासमोर आहे. जर हा उद्योग संपुष्टात आला ते विक्रेते, पुरवठादार, खाद्य निर्माते, शेतकरी, औषध विक्रेते, वाहतूकदार यांचा रोजगार अडचणीत येईल, अशी माहिती पोल्ट्री अॅण्ड ब्रीडर्स असोसिएशनच्या सूत्रांनी दिली. 

सध्या मक्याला पर्यायी कच्चा माल वापरावा लागत आहे. उत्पादन खर्च व विक्रीचे गणित बसत नाही. ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांच्या पाठीमागे उभे राहावे. नाहीतर हा उद्योग संपुष्टात आल्याने मोठी अर्थव्यवस्था अडचणीत येणार आहे.  - वसंतकुमार शेट्टी,  पोल्ट्री फार्मर्स ॲण्ड ब्रीडर्स असोसिएशन

नैसर्गिक प्रतिकूलतेत तग धरणारे जीएम मका, सोयाबीनच्या शेतीसाठी शेतकऱ्याना परवानगी द्यावी. नसेल तर यावर पर्याय म्हणून पोल्ट्री, कॅटल फीड्स उद्योगाला वरील पिकांची आयात तरी करून द्यावी. सद्यस्थितीत खाद्यामध्ये तृणधान्यांचा तुटवडा जाणवत असल्याने बाजरी, गहू, तांदूळ यांचा वापर होतोय. लवकर निर्णय न झाल्यास हा उद्योग अडचणीत सापडेल. यासाठी आमचा सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.  - श्रीकृष्ण गांगुर्डे , संचालक, एव्ही ब्रॉयलर्स

पोल्ट्री व्यवसायात खाद्याचे उत्पादनाच्या अंगाने गणित बिघडले आहे. आम्ही हमीभावावर मका खरेदी करण्यास तयार आहोत. मात्र, अधिक दर वाढल्यास शासनाने निर्यात करण्यासंबंधीचा निर्णय घेऊन दिलासा द्यावा. त्यामुळे मका उत्पादक व पोल्ट्री व्यावसायिक दोन्ही घटक जगू शकतील. - उद्धव आहिरे,  व्यवस्थापकीय संचालक, आनंद ॲग्रो ग्रुप

मक्याची बाजारातील स्थिती 

  • देशभरात पोल्ट्री उद्योगासाठी मक्याची मागणी : ५१ टक्के
  • मका हमीभाव ः १७०० रुपये प्रतिक्विंटल
  • सध्याचे मक्याचे दर ः२४०० रुपये प्रतिक्विंटल
  • मका खाद्याचे दर ः ३३ रूपये प्रतिकिलो
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com