पुणे जिल्ह्यात `बंद`ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा मोर्चाच्या `बंद`ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठा मोर्चाच्या `बंद`ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे ः क्रांतिदिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) राज्यासह पुणे जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. त्याला पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील मराठा आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. पुणे शहरातही मराठा कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता मोर्चा काढून आरक्षणप्रश्नी सरकारच्या विरोधात घोषणात देत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र अाले होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना मराठा कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षण जाहीर होईपर्यत मेगा भरती स्थगित करावी, अशा विविध मागण्या या आंदोलकांच्या होत्या.

बंदच्या काळात खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट बंद सेवा खंडित करण्यात आली होती. पुण्यातील शिरूर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद केले होते. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू नयेत, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

जिल्ह्यात सुरक्षेसाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पोलिस तर ९०० हून अधिक होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, वीस ट्रायकिंग फोर्स, दंगल नियंत्रण पथकांचा बंदोबस्त रस्त्यावर उतरवण्यात आला होता. पुणे शहरातील लक्ष्मी रोड व चांदणी चौक येथे आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे पीएमपीएमएल बसच्या काचा फुटून बंदला हिंसक वळण लागले.  

पिंपरी चिंचवडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्याजवळील पिंपरी, चाकण, भोसरी, हिंजवडी, तळवडे, कुंदळवाडी एमआयडीसी भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे या भागातील जवळपास सर्वच कंपन्या बंद होत्या. पुणे मार्केट यार्डमध्ये कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. त्या वेळी पुणे बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती.

बारामतीत मराठा मोर्चेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानासमोर सकाळी नऊ वाजता जमा होऊन ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सहभागी झाले होते. अजित पवारांनी आंदोलकांसमवेत सरकार विरोधात घोषणाही दिल्या. तसेच शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या तालुक्यांतही मराठा आंदोलकांनी कडकडीत बंद केला होता.

बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी परिपत्रक काढून सुटी जाहीर केली होती. यानुसार जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेत सुटी दिली होती. मात्र, बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. त्यामुळे दूध आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू होत्या. पुणे शहरातही बहुतांशी दुकाने, हाॅटेल्स बंद होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. परंतु यास नकार दिल्याने तोडफोड केल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com