सोनं तारण ठेवतो म्हटलं, तरीबी कर्ज न्हाई..

सोनं तारण ठेवतो म्हटलं, तरीबी कर्ज न्हाई..
सोनं तारण ठेवतो म्हटलं, तरीबी कर्ज न्हाई..

सोलापूर : ‘‘ऐंशी हजाराचं पीककर्ज हाय, गावातल्या बॅंकेतनं कर्ज काढलंय, ते कर्जमाफीतही बसलं, पण पैसं जमा नसल्यानं बॅंकवाले म्हणतात, अजूनबी मी थकबाकीदार हाय, यंदा पुन्हा कर्ज मिळणार न्हाई. म्हणून नान्नजच्या बॅंकेत आलू, तर तिथं बी न्हाई म्हणत्यात. आता सोनं तारण ठेवतू म्हटलं, तरी बी कर्ज देईनात,’’ उत्तर सोलापुरातील कळमणचे शेतकरी सोमनाथ रामदास करंडे यांची ही व्यथा. कांद्याचं रोप टाकायचंय, ढोबळी मिरची लावाचीय, आता काय करावं, अशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावर आहे. जिल्हा बॅंक असो अथवा राष्ट्रीयीकृत बॅंकांपैकी काही बॅंका सोडल्या तर शेतकऱ्यांशी संवाद तर सोडाच, बहुतेक बॅंका शेतकऱ्यांना थेट ठेंगाच दाखवत असल्याचं चित्र आहे. सोलापूर जिल्हा हा खरीप हंगामाचा जिल्हा नाही; पण अलीकडच्या काळात खरिपातही बऱ्यापैकी पिके घेतली जात आहेत. विशेषतः तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांशिवाय कांदा, भाजीपाला पिकांवर सर्वाधिक भर असतो. शिवाय ऊस, डाळिंब, द्राक्ष ही नियमित नगदी पिके आहेतच, यामध्ये पावसाच्या भरवशावर शेतकरी खरिपातील नियोजन करतो, त्यात पीककर्ज त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. आज जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्‍यातील जिल्हा बॅंका आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये पीककर्जासाठी शेतकऱ्यांची रेलचेल दिसते. कोणाच्या हातात फॉर्म आहे, कोणाची कागदं अर्धवट आहेत, कोणाला उद्या, परवा या, असं सुनावलं जातंय, कोणाला नुसतंच हेलपाटे मारायला लावणे सुरू असल्याचे चित्र आहे, तर कुठे अधिकारीच जागेवर नाहीत, कोण रजेवर आहे, कोण दुसऱ्या शाखेतला पदभार म्हणून गेलाय, सोलापूर शहरालगत असलेल्या उत्तर सोलापुरातील काही बॅंकांमधील ही स्थिती आहे. मग दूरवरच्या जिल्ह्यातील अन्य शाखांची स्थिती काय असेल? याचा विचार न केलेलाच बरा. उत्तर सोलापुरातील वडाळा, नान्नज येथील राष्ट्रीयीकृत बॅंकांना भेट दिल्यानंतर हे चित्र समोर आलं. सोमनाथ करंडे हे त्यापैकीच एक प्रातिनिधिक शेतकरी. नान्नजच्या स्टेट बॅंकेत आले होते. हातात सोन्याच्या चैनची पुडी घेऊन शाखा व्यवस्थापकांना भेटले. मला सोनं ठेवून कर्ज हवंय, अशी मागणी त्यांनी केली; पण तुमच्या गावात बॅंक असताना इकडे कसे आलात, थकबाकीदार आहात काय? असा प्रतिप्रश्‍न समोरून आला. तेव्हा शेतकरी करंडे यांनी हो, ‘‘८० हजाराचं कर्ज हाय, कर्जमाफीचा फारम भरलाय, पण पैसं जमा झालं न्हाईती. मी थकबाकीदार दाखवतोय, त्यामुळं मला पुन्हा कर्ज मिळणार न्हाई. पण मला आता पैशाची गरज हाय, त्या बॅंकेत सोनं बी ठेवून घेतलं न्हाई, म्हणून तुमच्या बॅंकेत आलो,’’ असं खरं वास्तव सांगूनही आणि सोनं तारण ठेवून कर्जाची मागणी करूनही शाखा व्यवस्थपकांनी करंडे यांना चार शब्द सुनावून परतावले.  तेव्हा हताश झालेले करंडे म्हणाले, ‘‘माझ्या स्वतःच्या शेतात पाणी न्हाई, त्यासाठी गेल्या वर्षी पाणी, पाइपलाइनसाठी ८० हजाराचं कर्ज काढलं. पण पिकलंच न्हाई. फेडणार कसं? यंदा कर्जमाफीत बसलुय. पण ती अजून मिळालेली न्हाई. आता दुसऱ्याचं शेत करतुया, त्यात यंदा कांद्याचं रोप टाकायचंय, ढोबळी मिरचीबी करायच्याय, पण पैसं न्हाईती. त्यासाठी सोन्याची चैन गहाण ठेवून पैसं काढावं म्हटलं तर ही अडचण काय करावं, सुचत न्हाई. आता सावकाराशिवाय पर्याय न्हाई बघा.’’ हे प्रातिनिधिक आणि बोलके चित्र सर्रास बॅंकात पाहायला मिळते.  नान्नजचेच एक शेतकरी गणेश पवार यांनी मात्र यंदा मला बॅंकेने नव्याने दोन लाखाचं कर्ज दिल्याचं सांगितलं. या आधी पाइपलाइन, ड्रीपसाठी १ लाख ३२ हजाराचं कर्ज घेतलं होतं, ते फेडल्यानं बॅंकेनं यंदा आपलं काम केलं बघा, असं काहीसं उत्तर देऊन काही कागदं राहिलीती देऊन येतो, असं सांगून आपलं म्हणणं आटोपतं घेतलं. वडाळ्याच्या बडोदा बॅंकेत कर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी नव्हती. पण कर्जमाफीचं कुठंवर आलंय? हे विचारणारे एक-दोन शेतकरी आले होते. ५८ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज नान्नजच्या स्टेट बॅंकेत यंदा कर्जमाफी मिळालेल्या पाच शेतकऱ्यांना आणि एप्रिलपासून आतापर्यंत नव्याने ५२ अशा ५८ शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. सुमारे ९८ लाख ९० हजाराचं कर्जवाटप या शाखेतून झाले आहे. यंदा बॅंकेला एक कोटीचं टार्गेट होतं. ते पूर्ण झालं आहे. कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक आम्ही करत नाही. ज्याची कागदं योग्य आहेत, जो पात्र आहे, त्याला कर्ज देतोच, असे बॅंकेचे कृषी अधिकारी धनंजय इंगळे यांनी सांगितलं.

जिल्हा बॅंक बरखास्त, प्रशासकावर भिस्त सोलापूर जिल्हा बॅंकेकडून बेकायदेशीररित्या कर्जवाटप झाल्याने संचालक मंडळ काही दिवसांपूर्वीच बरखास्त करण्यात आले आहे. सध्या जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी आहे. सध्या नवीन कर्जवाटप झालेलं नाही, फक्त नवीन-जुने सुरू आहे. त्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ८ हजार ७४६ शेतकऱ्यांना ८१ कोटी २४ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे; पण प्रशासकांनी सध्या वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे नव्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी प्राधान्य देऊ, असं श्री. देशमुख यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेची सगळी भिस्त प्रशासकाच्या कामकाजावर आहे. परवा थोडा पाऊस झालाय, म्हटलं यंदा कांदा, ढोबळी मिरची करावं, त्यासाठी पैशाची निकड हाय, सोनं तारण ठेवल्यास ७० टक्‍क्‍यांपर्यंतच पैसं आम्हाला देतात. तरीबी बॅंक न्हाई म्हणत असंल, तर आम्ही काय करावं. ऐन हंगामाच्या तोंडावर ही पंचायत हून बसलीय बघा. काय सुचत न्हाई.  - सोमनाथ करंडे, शेतकरी, कळमण, उत्तर सोलापूर कागदासाठी हेलपाटे मारावंच लागतात. पण यंदा बॅंकेची अडचण झाली न्हाई. याआधीचं कर्ज फेडल्यानं मला बॅंकेनं पुन्हा कर्ज दिलंय, यंदा दोन लाख मिळालेत, आता फाउंडेशनवर दोडका लावायचाय, बघू आता काय व्हतंय.  - गणेश पवार, शेतकरी, नान्नज, उत्तर सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com